महामार्ग दुर्घटनांतील सर्व मृतांच्या कुटुंबांना संबंधित कंपनीकडून भरघोस नुकसान भरपाई द्या : जळगावचे नगरसेवक अरविंद देशमुख यांची मागणी

बायपास अपघात प्रकरणी गुन्हा दाखल ; जळगाव शहरातील पाच मृत्यूंच्याही स्वतंत्र फिर्यादी घेऊन गुन्हे नोंदवण्याची मागणी


जळगाव (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : राष्ट्रीय महामार्ग क्र. 53, पाळधी जळगाव बायपास तसेच जळगाव शहरातील महामार्गावर झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या कायदेशीर वारसांना संबंधित कंत्राटदार कंपनीकडून तातडीने भरघोस आर्थिक मदत आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, अशी मागणी जळगावातील भाजपाचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे.

त्रृटींबाबत इशारा मात्र बेफिकीरी कायम
पाळधी जळगाव बायपासच्या कामाची स्थिती, ओव्हरब्रिजचा भराव खचणे, अपुरे बॅरिकेडिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर, प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियोजनातील त्रुटींबाबत देशमुख यांनी 8 ऑगस्ट 2026 पासून नहीं तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करून संभाव्य जीवितहानीचा धोका निदर्शनास आणून दिला होता. दरम्यान, बायपासवरील दुर्घटनेच्या संदर्भात जळगाव तालुका पोलिसांनी ‘ग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी.एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा क्र. 262/2026 दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा बायपासवरील दुर्घटनेशी संबंधित असून जळगाव शहरातील महामार्गावर झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पाच नागरिकांच्या मृत्यूंचा त्यामध्ये समावेश झालेला नाही, हा गंभीर मुद्दा देशमुख यांनी उपस्थित केला आहे.


स्वतंत्र फिर्याद दाखल करण्याची मागणी
बायपास दुर्घटनेप्रकरणी जबाबदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याच धर्तीवर जळगाव शहरातील महामार्ग दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्या पाच नागरिकांच्या कुटुंबीयांच्या स्वतंत्र फिर्यादी घेऊन आवश्यकतेनुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात यावेत. महामार्गाची दुरवस्था, अपुर्‍या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्थेतील त्रृटी किंवा संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्यास जबाबदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.

वारसांना भरघोस आर्थिक मदत द्यावी
जळगाव शहरातील पाच मृतांच्या कुटुंबीयांच्या फिर्यादी घेऊन स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत आणि त्याचबरोबर संबंधित कंत्राटदार कंपनीकडून प्रत्येक मृताच्या कायदेशीर वारसांना भरघोस आर्थिक मदत व जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी. बायपास असो अथवा जळगाव शहरातील महामार्ग-दुर्घटना कोणत्या हद्दीत घडली यावरून मृतांच्या कुटुंबीयांमध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ नये. सर्व पीडित कुटुंबांना समान आर्थिक आणि कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

निष्पक्ष हवी पडताळणी
मंगला अर्जुन माळी, प्रेमराज शिवराम चौधरी, योगेश कडू महाजन, अनिरुद्ध सुरेश डहाके तसेच ममुराबाद-आसोदा बायपास सर्व्हिस रोडवरील दुर्घटनेनंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेले शांताराम केशव पाटील यांच्यासह महामार्ग व बायपास दुर्घटनांतील सर्व मृतांच्या प्रकरणांची स्वतंत्र आणि निष्पक्ष पडताळणी करावी. दुर्घटनेचे ठिकाण, कारण, तेथील महामार्गाची स्थिती आणि उपलब्ध सुरक्षा उपायांचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जखमींनाही पात्रतेनुसार नुकसान भरपाई द्यावी
ज्या प्रकरणांमध्ये महामार्गाची धोकादायक स्थिती, अपुरे बॅरिकेडिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा प्रकाशव्यवस्थेचा अभाव, वाहतूक नियोजनातील त्रृटी अथवा संबंधित अधिकारी-कंत्राटदारांचा निष्काळजीपणा आढळून येईल, त्या प्रत्येक प्रकरणात छक-ख, संबंधित कंत्राटदार कंपनी, विमा कंपनी आणि इतर जबाबदार यंत्रणांची कायदेशीर व आर्थिक जबाबदारी निश्चित करावी. लागू कायदे आणि विमा तरतुदींनुसार मृतांच्या वारसांना संबंधित कंपनीकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांचीही माहिती संकलित करून त्यांना उपचारांचा संपूर्ण खर्च आणि पात्रतेनुसार नुकसानभरपाई संबंधित कंपनीकडून मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कार्यवाही करण्यात यावी, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रत्येक मृत्यूची स्वतंत्र चौकशी करा
निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. केवळ बायपासवरील एका प्रकरणात गुन्हा दाखल करून जळगाव शहरातील इतर मृत्यूंकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रत्येक मृत्यूची स्वतंत्र चौकशी करा, कुटुंबीयांच्या फिर्यादी नोंदवा, दोषींवर गुन्हे दाखल करा आणि सर्व मृतांच्या कुटुंबांना संबंधित कंत्राटदार कंपनीकडून भरघोस नुकसानभरपाई मिळवून द्या. प्रत्येक पीडित कुटुंबाला कायदेशीर व आर्थिक न्याय मिळेपर्यंत हा पाठपुरावा थांबणार नाही, असा ठाम इशारा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिला आहे.

संयुक्त बैठक घेण्याची अपेक्षा
या विषयावर जिल्हाधिकार्‍यांनी नहीं, पोलीस प्रशासन, संबंधित कंत्राटदार कंपनी, विमा कंपनी आणि संबंधित विभागांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक मृताच्या कुटुंबाबाबत स्वतंत्र व ठोस निर्णय घ्यावा. कंपनीची आर्थिक जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !