आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश ; यावल नगरपरिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विविध प्रकल्पासाठी 1.96 हेक्टर जमीन मंजूर


यावल (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : यावल शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यावल नगरपरिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (डढझ) उभारण्यासाठी गट नं. 1233 मधील एकूण 9.28 हेक्टर क्षेत्रापैकी 1.96 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिले आहेत. यामध्ये नगरोत्थान महाअभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी 1.25 हेक्टर आणि जलशुद्धीकरण केंद्रासाठी 0.71 हेक्टर, अशी एकूण 1.96 हेक्टर जमीन नगरपरिषदेस प्राप्त झाली आहे.

जलप्रदूषण रोखण्यास होणार मदत
या जागेवर मलजल प्रक्रिया केंद्र (एसटीपी), संबंधित संरचना, मलजल वाहिनी जाळे तसेच नाला अडवणे व वळवणे यासह आवश्यक कामे करण्यात येणार आहेत त्यामुळे यावल शहरातील सांडपाणी नद्यांमध्ये मिसळून होणारे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार असून, पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे. यावल शहरातील भुयारी गटार योजनेसाठी 125 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, या योजनेतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत प्रथम टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


या संपूर्ण प्रक्रियेसाठी आमदार अमोल जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे यावल शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागून नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !