बोदवडला शिक्षकाच्या अश्लील वर्तनानंतर संतप्त जमावाने कार पेटवली : आरोपीला अटक
संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज : पोलीस अधीक्षकांसह अपर अधीक्षकांची धाव
बोदवड (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : एका खाजगी क्लास चालकाने बोदवड तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी केलेल्या अश्लील वर्तनानंतर संतप्त जमावाने संशयीत शिक्षकाच्या जामठीतील घराबाहेर असलेली कार पेटवली व आक्रमक होत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. या प्रकारानंतर जिल्हाभरातून पोलीस कुमक मागवण्यात आली असून जामठी व बोदवड शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशयीत शिक्षकाला पोलिसांनी पोस्कोच्या गुन्ह्यांंतर्गत अटक केली आहे. पोलिसांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे प्रकरण ?
बोदवड शहरातील एका अॅकेडमीत जामठी येथील शिक्षक खाजगी पाचवी ते बारावीपर्यंतचे क्लास घेतात. संशयीत शिक्षकाने एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन व अयोग्य मागणी केल्याचा आरोप आहे तर मुलीसोबत शिक्षक कारमधून जात असताना पीडीतेच्या नातेवाईकांनी पाहून विचारणा केली मात्र शिक्षकाने उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने वाद अधिकच वाढला. त्यानंतर संबंधित शिक्षकाच्या जामठी गावातील घराजवळ असलेली कार पेटवण्यात आली तसेच अन्य वाहनांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. संतप्त जमावाकडून किरकोळ दगडफेकही झाल्याची माहिती आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळी धाव शांतता प्रस्थापीत केली.


