अमिताभ, सलमान, आमिर खानसह अक्षय कुमारच्या घराची रेकी : कमकुवत सुरक्षेमुळे टायगर श्रॉफवर गोळीबार !
शस्त्र पुरवठ्याच्या आरोपावरून दोन महिलांसह चौघांना अटक
मुंबई (बुधवार, 21 ऑक्टोबर 2026) : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा पोलीस तपासाच्या वृत्तांतून करण्यात आला आहे. टायगर यांच्यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांना लक्ष्य करण्याची योजना आरोपींनी आखली होती मात्र त्यांच्या घरांभोवती असलेल्या कडेकोट सुरक्षेमुळे हा कट बदलण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन महिलांसह आणखी चार जणांना अटक केली असून, त्यांच्यावर हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे.
मोठ्या अभिनेत्यांच्या घरांवर पाळत; सुरक्षेमुळे बदलली योजना
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांच्या घरांची पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणातील सोनीपत येथील कुणाल (21) आणि सुमित (19), तसेच उत्तर प्रदेशातील राधा (23) आणि बबिता (23) अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.




बडे सेलेब्रिटी लक्ष
तपासातील माहितीनुसार, आरोपींना सुमारे महिनाभरापूर्वी मुंबईत पाठवण्यात आले होते. लॉरेन्स टोळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या अनिल पंडित याने त्यांना बॉलिवूडमधील एखाद्या मोठ्या अभिनेत्याला लक्ष्य करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित अभिनेत्यांच्या निवासस्थानांची पाहणी करून त्याचे व्हिडिओ अनिल पंडित याच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे मात्र सुरक्षेची कडक व्यवस्था पाहून आरोपींनी आपली रणनीती बदलल्याचे तपासात उघड झाल्याचे वृत्त आहे.
सात दिवसांच्या पाहणीनंतर टायगर श्रॉफला लक्ष्य
मोठ्या अभिनेत्यांच्या घरांऐवजी टायगर श्रॉफ यांना लक्ष्य करण्याचा निर्णय आरोपींनी घेतल्याचे तपासातून समोर आले आहे. टायगर हे दर रविवारी संध्याकाळी फुटबॉल खेळण्यासाठी येत असल्याची माहिती आरोपींनी इंटरनेटवरून मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा आणि परिसराची सुमारे सात दिवस पाहणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. टायगर यांच्यासोबत छायाचित्र काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या कारजवळ पोहोचून हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. घटनास्थळी गर्दी असतानाच आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या कटात सहभागी असलेला आणखी एक तरुण हल्ल्याच्या आदल्या रात्री सिगारेट पिण्याच्या बहाण्याने हॉटेलमधून निघून गेल्याचेही आरोपींच्या चौकशीतून समोर आल्याचे वृत्त आहे.
दोन महिलांमार्फत शस्त्रे पोहोचवल्याचा संशय
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी या प्रकरणात आणखी चार जणांना अटक केली. यामध्ये कुणाल, सुमित, राधा आणि बबिता यांचा समावेश आहे. कुणाल आणि सुमित यांनी शस्त्रांची व्यवस्था केली, तर राधा आणि बबिता यांच्या माध्यमातून ती शस्त्रे प्रत्यक्ष गोळीबार करणार्या आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप आहे. कुणालचा अनिल पंडित याच्याशी संपर्क असल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स टोळीशी संबंधित घटकांनी स्वीकारल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाले होते. या सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
यापूर्वी गोळीबार प्रकरणातील आरोपी ऋतिक, रेहान आणि फूलसिंग यांना सोमवारी राजस्थानातील कोटा येथून अटक करण्यात आली होती.
18 ऑक्टोबरला जुहूमध्ये झाला होता गोळीबार
मुंबईतील जुहू परिसरात 18 ऑक्टोबरच्या संध्याकाळी टायगर श्रॉफ यांच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यावेळी टायगर फुटबॉल खेळून परतत होते. या घटनेत टायगर सुरक्षित राहिले; मात्र त्यांचा चालक जखमी झाला.
