शिक्षक दिनानिमित्त उद्या थोर सन्मित्र युवा फाउंडेशनकडून 55 शिक्षकांचा होणार सन्मान
थोरगव्हाण, ता.रावेर (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : सामाजिक कार्यातील अग्रेसर थोर सन्मित्र युवा फाउंडेशन, थोरगव्हाण यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शनिवार, 5 रोजी सकाळी 9.45 वाजता 55 शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. थोरगव्हाण येथील डी.एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा सोहळा होईल.
या समारंभात डी. एस. देशमुख विद्यालयातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच थोरगव्हाण केंद्रातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमात एकूण 55 शिक्षकांचा सत्कार करण्यात येईल.

शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना प्रत्येक शिक्षकाचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ज्ञानदानाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांना घडविणार्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याची ही विशेष संधी असून, या उपक्रमातून शिक्षकांना सन्मानाची पावती मिळणार आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष उमाकांत वसंत बाऊस्कर, खजिनदार युवराज (विलास) माधव चौधरी, सचिव योगेश भागवत झोपे यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे.

