पुस्तकातील सात्त्विक विचारांतून जीवनाचे तत्त्वज्ञान उलगडते

कृष्णांत पिंगळे : श्रीकांत सराफ लिखित ‘सहज सुचले म्हणून लिहिले’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात


यावल (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : पुस्तकातील सात्त्विक, आध्यात्मिक आणि अनुभवाधारित विचारांमधून जीवनाचे वास्तव व तत्त्वज्ञान उलगडते, असे प्रतिपादन पुणे पोलीस उपायुक्त कृष्णांत पिंगळे यांनी येथे केले. भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ लिखित ‘सहज सुचले म्हणून लिहिले’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुस्तक प्रकाशन सोहळा शनिवार, 12 सप्टेंबर यावल शहरातील स्टार रिसॉर्टमध्ये मोठ्या थाटात पार पडला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, व्यास प्रसादिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील, रमाकांत देशपांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील अधीक्षक स्नेहा सराफ, पत्रकार श्रीकांत जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वडिलांकडून मिळालेली अध्यात्मिक बैठक लेखनाची प्रेरणा
लेखक श्रीकांत सराफ यांनी प्रास्ताविकात पुस्तक लेखनामागील प्रेरणा आणि आपल्या लेखन प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांचे वडील स्व.पद्माकर सराफ यांनी बालपणापासून दिलेले संस्कार, अध्यात्माची बैठक, भागवत कथावाचनाची परंपरा आणि प्रसादिक विचार यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम झाला. याच विचारांची प्रेरणा पुढे लेखनातून व्यक्त होत गेली. जीवनातील विविध प्रसंग, अनुभव, नातेसंबंध, सुख-दुःख, मनाचे खेळ, कर्म, नामस्मरण आणि अध्यात्म यांचा विचार करताना ‘सहज सुचले म्हणून लिहिले’ या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. जीवनाकडे केवळ बाह्य यशाच्या दृष्टिकोनातून न पाहता, अनुभवांतून त्यातील अर्थ शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकातील लेखांमधून केला आहे. साध्या आणि सहज भाषेत वाचकांपर्यंत जीवनविषयक विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचेही श्रीकांत सराफ यांनी नमूद केले.

प्रत्येक प्रकरण म्हणजे आयुष्याचे एक प्रकटीकरण
अध्यक्षीय मनोगतात कृष्णांत पिंगळे यांनी श्रीकांत सराफ यांच्यासोबतच्या मैत्रीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनुभव सांगितला. सराफ यांचे पुस्तक हे केवळ लेखांचे संकलन नसून त्यामागे जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण जणू माणसाच्या आयुष्याचे प्रकटीकरण आहे. जीवनात येणारे अनुभव, त्यातून मिळणारे धडे आणि त्या अनुभवांमागील वास्तवाचे तत्त्वज्ञान या लेखनातून उलगडते. पुस्तकातील सात्त्विक आणि आध्यात्मिक विचारांचा ठेवा ही या पुस्तकाची मोठी जमेची बाजू आहे, असे कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. पिंगळे पुढे म्हणाले की, हे पुस्तक वाचकांना आत्मपरीक्षण करण्यास, जीवनातील छोट्या-छोट्या अनुभवांकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास आणि अध्यात्माशी नाते जोडण्यास निश्चितच प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाचकांना मिळेल आत्मचिंतनाची दिशा
यावलचे नगरसेवक अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त करून श्रीकांत सराफ यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ प्रवासासोबतच लेखन क्षेत्रातील नव्या वाटचालीचे कौतुक केले. पत्रकारीरतेत वास्तवाचे दर्शन घडविणार्‍या लेखणीने आता जीवन, अध्यात्म आणि अनुभव यांना शब्दरूप दिले आहे. ‘सहज सुचले म्हणून लिहिले’ हे पुस्तक वाचकांना आत्मचिंतनाची दिशा देईल, असे त्यांनी सांगितले.

पुस्तक लेखनाचा उपक्रम स्तुत्य
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी मनोगतात श्रीकांत सराफ यांना पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल शुभेच्छा दिल्या. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडताना त्यांनी केलेले काम आणि आता पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

उज्ज्वल निकम यांचा दूरध्वनी संदेश
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दूरध्वनी संदेशाद्वारे प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. पुस्तकाच्या माध्यमातून श्रीकांत सराफ यांनी आपल्या अनुभवांना आणि विचारांना दिलेले शब्दरूप वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

लेखनाचे विश्लेषण
पत्रकार श्रीकांत जोशी यांनी पुस्तकातील आध्यात्मिक आणि अनुभवजन्य लेखनाचे विश्लेषण केले. दैनंदिन जीवनातील प्रसंगांमधून मोठे तत्त्वज्ञान शोधण्याची लेखकाशी असलेली हातोटी पुस्तकातून जाणवते. अध्यात्म आणि वास्तव यांची सांगड घालताना वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे लेखन पुस्तकात असल्याचे त्यांनी नमूद

आईने व्यक्त केला मुलाच्या पहिल्या पुस्तकाचा आनंद
लेखकाच्या आई पुष्पा सराफ यांनी मुलाच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाचा आनंद भावनिक शब्दांत व्यक्त केला. वडील स्व.पद्माकर सराफ यांच्या संस्कारांची आठवण करून देताना त्यांनी मुलाने वडिलांची विचारांची परंपरा पुढे नेल्याचा अभिमान व्यक्त केला.

मंत्री संजय सावकारे यांची भेट
प्रकाशन सोहळ्यादरम्यान महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी स्टार रिसॉर्ट येथे भेट देऊन लेखक श्रीकांत सराफ यांचे अभिनंदन केले. पुस्तकासाठी शुभेच्छा देत त्यांच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन बी.पी.वैद्य यांनी तर आभार डी.पी.जोशी यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यास जळगाव जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यप्रेमी, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच यावल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले. वेदांत सराफ, सिध्दांत सराफ यांच्यासह सरस्वती विद्या मंदिर माजी मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी आणि सहकार्‍यांनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !