भुसावळात पोलिसांचा डीजे चालकांना इशारा ; ध्वनी मर्यादा ओलांडल्यास होणार कडक कारवाई
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांची डीजे चालकांसोबत कॉर्नर बैठक
भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : आगामी सण, उत्सव आणि मिरवणुका शांततेत व शिस्तीत पार पडाव्यात तसेच नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी भुसावळ पोलिसांनी डीजे व साऊंड सिस्टीम चालकांना ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत अष्टभुजा चौकात शहरातील स्थानिक डीजे चालक, साऊंड सिस्टीम मालक आणि ऑपरेटर यांची विशेष कॉर्नर बैठक घेतली. ध्वनी मर्यादा ओलांडल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी पोलीस उपअधीक्षकांनी दिला.
ध्वनी प्रदूषणाच्या त्रासावर पोलिसांची मोहिम
या बैठकीस बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपविभागीय गोपनीय शाखेचे अंमलदार उपस्थित होते. आगामी काळातील विविध सण, उत्सव आणि मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता.



सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना
बैठकीदरम्यान पोलीस प्रशासनाने उपस्थित डीजे चालक व साऊंड ऑपरेटरना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 अंतर्गत निर्धारित ध्वनी मर्यादांचे पालन करण्याचे निर्देश दिले.
अशी आहे ध्वनी मर्यादा
शांतता क्षेत्रात म्हणजे रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरापासून 100 मीटरच्या क्षेत्रात दिवसा कमाल 50 तर रात्री 40 डेसीबल मर्यादा आहे.
रहिवासी क्षेत्रात दिवसा कमाल 55 तर रात्री 45 डेसीबल तर व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 65 व रात्री 55 डेसीबल मर्यादा आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा 75 व रात्री 70 डेसीबल अशी मर्यादा आहे.
सामान्यतः दिवसाची वेळ सकाळी सहा ते रात्री 10 आणि रात्रीची वेळ रात्री 10 ते सकाळी सहा अशी आहे. रात्री 10 नंतर उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
नॉईज मीटरद्वारे थेट प्रात्यक्षिक
बैठकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी डिजिटल ध्वनी मापक यंत्र वापरून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. आवाजाची तीव्रता कशा पद्धतीने मोजली जाते, घटनास्थळावर ध्वनी नमुने कसे नोंदवले जातात आणि विहित मर्यादेपेक्षा आवाज वाढल्यास त्याची यंत्रावर कशी नोंद होते, हे ऑपरेटरना समजावून सांगण्यात आले.
यावेळी डीजे किंवा साऊंड सिस्टीमची क्षमता वाढवून कर्णकर्कश आवाज करणे, क्षमतेपेक्षा अधिक बेस वाजवणे अथवा निर्धारित ध्वनी मर्यादा ओलांडणे टाळावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली.
नियम मोडल्यास साहित्य जप्तीसह कारवाई
विहित डेसिबल मर्यादा ओलांडून ध्वनी प्रदूषण करणार्या, कर्णकर्कश आवाज करणार्या किंवा न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यकतेनुसार साऊंड सिस्टीम व संबंधित साहित्य जप्त करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला.
नागरिक, रुग्ण, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याचा विचार करून साऊंड सिस्टीम चालकांनी कायदेशीर मर्यादेतच आवाज ठेवावा. सण-उत्सव आणि मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले.
