यावल शहरात चार मंदिरात श्रीमद भागवत कथा सप्ताह
दत्त, देवी, विठ्ठल व लक्ष्मीनारायण मंदिरात विविध निरूपणकारांचे भागवत वाचन ; 26 रोजी सप्ताहाचा समारोप
यावल (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) :यावल शहरातील विविध मंदिरांमध्ये रविवार, 20 सप्टेंबर ते शनिवार, 26 सप्टेंबर या कालावधीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्री दत्त मंदिर, देवी मंदिर, विठ्ठल मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सात दिवस धार्मिक वातावरणात भागवत कथेचे वाचन व निरूपण होणार आहे.
श्री दत्त मंदिरात श्याम शास्त्री नाईक, देवी मंदिरात अथर्व
बयानी, विठ्ठल मंदिरात मोरेश्वर महाराज बयाणी, तर श्री लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीकांत महाराज सराफ हे श्रीमद् भागवत कथेचे वाचन व निरूपण करणार आहेत.



दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत संहिता व संस्कृत वाचन, तर दुपारी 2.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भागवत कथेचे निरूपण केले जाणार आहे. भागवत कथेतील विविध प्रसंग, भगवान श्रीकृष्णाचे चरित्र, भक्ती, अध्यात्म आणि जीवनमूल्यांचे निरूपण या माध्यमातून भाविकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
शनिवारपासून गोकर्ण वाचन
शनिवार, 19 सप्टेंबर रोजी गोकर्ण वाचनाने या धार्मिक उपक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 20 ते 26 सप्टेंबरदरम्यान श्रीमद् भागवत कथा सप्ताह होईल. 26 सप्टेंबर रोजी सप्ताहाचा समारोप करण्यात येणार असून, 27 सप्टेंबर रोजी गीता वाचनाचा कार्यक्रम होणार आहे.
यावल शहरासह परिसरातील भाविकांनी या सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
