यावल शहरात सुमारे दहा कोटींच्या विकासकामांचे लवकरच भूमिपूजन : नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील यांची माहिती


यावल (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : यावल नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये मंजूर झालेल्या विकासकामांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांचा सातत्याने पाठपुरावा करून विविध कामांना मंजुरी मिळविण्यात आली. या कामांची एकत्रीत किंमत सुमारे दहा कोटी रुपये आहे.

या विकासकामांना मंजुरी
मंजूर कामांमध्ये सातोद रोडवरील परिसरात पाण्याची टाकी उभारणे (मंजूर रक्कम 2.29 कोटी रुपये), पंडितनगर येथे डांबरीकरण करणे (15 लक्ष रुपये), कृष्ण तारानगर नगर भागात डांबरीकरण रस्ता व गटार करणे (60 लक्ष रुपये), बालाजी सिटी परिसरात रस्ता व गटार करणे (25 लक्ष रुपये), बाबा नगर भागात गटार बांधकाम करणे (40 लक्ष रुपये), खिर्णिपुरा येथे गटार बांधकाम (20 लक्ष रुपये), बारी वाड्यात संत रूपलाल महाराज प्रवेशद्वार उभारणे (आठ लक्ष रुपये), साने गुरुजी विद्यालयाच्या पूर्वेकडील नवीन प्रवेशद्वार बांधणे (10 लक्ष रुपये) व साने गुरुजी विद्यालयात व्यायामशाळेसाठी ओपन जिम बांधणे (11 लक्ष), साने गुरुजी विद्यालयाचे रंगकाम करणे (20 लक्ष) आदी विकासकामांचा समावेश आहे. साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम ही नागरिकांची पूर्वीपासूनची मागणी होती व ती आता मार्गी लागणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

या कामांचाही समावेश
फैजपूर-चोपडा रस्त्यावरील डिव्हायडरचे सुशोभीकरण (10 लक्ष रुपये), शहरात शेतकरी दांपत्याचे शिल्प उभारणे आठ लक्ष रुपये, अक्सानगर भागात डांबरीकरण करणे (80 लक्ष रुपये), वाणी गल्लीतील गटार बांधकाम करणे (20 लक्ष रुपये), स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पाच वेगवेगळ्या ठिकाणी शौचालय व मुतारी बांधकाम करणे (95 लक्ष रुपये), पांडुरंग सराफ नगरातील डांबरीकरण व गटार बांधकाम करणे (25 लक्ष रुपये), दगडूशेठ सोनार ते डॉ.देशमुख यांच्या घराजवळ गटार बांधकाम करणे (10 लक्ष रुपये), मदिना नगर भागात रस्ता-गटाराचे बांधकाम करणे (60 लाख रुपये), शहरात विविध तीन ठिकाणी वॉटर एटीएम बसवणे (10 लक्ष रुपये), शहरात इन डोअर जीम (15 लक्ष रुपये), यावल शहरात वृक्षारोपण करणे (पाच लक्ष रुपये), कलाकार कट्टा तयार करणे (पाच लक्ष रुपये) तसेच शहरातील कचरा संकलन व त्यावर प्रक्रिया करण्याच्या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची मान्यता प्रस्ताव पाठविला आहे. यावल शहरातील व तालुक्यातील नागरिकांसाठी शववाहिनी व शहरातील नागरिकांसाठी शवरथ (सुमारे 40 लक्ष रुपये) निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

कामे मंजुरीसाठी समन्वय महत्त्वाचा
नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कामे मंजूर होण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, सर्व सहकारी नगरसेवक तसेच नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांचे सहकार्य आणि प्रशासकीय समन्वय राहिला आहे. या विकासकामांसाठी निधी व प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी जळगाव, नगरविकास विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे नगराध्यक्षांनी आभार मानले.

लवकरच कामांचे होणार भूमिपूजन : नगराध्यक्षा
निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेल्या शब्दानुसार शहरातील आवश्यक विकासकामांना प्राधान्य देऊन त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असून उर्वरित आवश्यक कामांसाठीही पाठपुरावा सुरू राहील, असे नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील यांनी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !