भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती’ विषयावर रंगली वादविवाद स्पर्धा
भुसावळ (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : शहरातील पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती: योग्य की अयोग्य?’ या अत्यंत समकालीन आणि महत्त्वाच्या विषयावर वादविवाद स्पर्धा रंगली. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले विचार अतिशय प्रभावीपणे मांडले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे होते. सूत्रसंचालन रमा मसाने यांनी केले. प्रास्ताविक समिती चेअरमन ज्योती पाटील यांनी केले. स्पर्धेला दोन गट करण्यात आले.
ऑनलाइन पद्धतीमुळे शिक्षण झाले सुलभ
पहिला गट ऑनलाइन शिक्षणाच्या बाजूने (योग्य) आणि दुसरा गट त्याविरुद्ध (अयोग्य) बाजू मांडत होता. ऑनलाइन शिक्षणाच्या बाजूने बोलताना विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, ऑनलाईन पद्धतीमुळे शिक्षण अधिक सुलभ, लवचिक आणि आधुनिक झाले आहे. घरबसल्या जागतिक दर्जाचे ज्ञान मिळवणे यामुळे शक्य झाले असून वेळेची आणि पैशांची मोठी बचत होते. कोरोना काळातील शैक्षणिक खंड ऑनलाइन शिक्षणामुळेच भरून निघाला, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला.
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सामाजिक संवाद संपला
विरुद्ध बाजू मांडणार्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणातील त्रृटींवर बोट ठेवले. सतत स्क्रीनसमोर बसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, विशेषतः डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम त्यांनी मांडले. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सामाजिक संवाद कमी होत असून प्रत्यक्ष वर्गात मिळणारे संस्कार आणि शिस्त यापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना येणार्या अडचणींवरही विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ.कुंदा चौधरी, प्रा.एन.झेड.रत्नपारखी, प्रा.एन. पी.निळे यांनी केले. दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढत अतिशय आक्रमक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपली मते मांडली.
स्पर्धेचा निकाल असा- प्रथम- अन्वी प्रांजल नेवे (अकरावी, विज्ञान), द्वितीय- वारुणी कुंदन पाटील (अकरावी- विज्ञान), तृतीय- यशश्री राजेंद्र चव्हाण ( अकरावी- विज्ञान), उत्तेजनार्थ- सोनल किरण राणे (अकरावी- विज्ञान).
प्राचार्य बर्हाटे यांनी आपल्या भाषणात प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणतेही मत शंभर टक्के योग्य किंवा अयोग्य नसते. प्रत्येकाला आपण मांडत असलेली बाजू योग्य वाटते. तरी हा विषय केवळ वैचारिक पर्वणी म्हणून घ्यावा, असे ते म्हणाले. आभार प्रदर्शन प्रा.ललिता धांडे यांनी मानले.
कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य वाय.एम.पाटील व पर्यवेक्षिका स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धांमध्ये याचप्रमाणे उत्स्फुर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले. समिती सदस्य प्रा.ए.बी.पालवे व जे.टी.बेंडाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




