संस्कृतीच्या जतनासह लोकपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे : मंत्री संजय सावकारे

केशवस्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित भुलाबाई महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद : 28 संघाचा सहभाग


भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : बदलत्या आधुनिक जीवन शैलीमुळे पारंपरिक सण-उत्सव आणि लोकपरंपरांपासून नव्या पिढीचे अंतर वाढत आहे. अशा काळात आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करून लोकपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाज म्हणून प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे केले. केशवस्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित ‘भूलाबाई महोत्सवात’ ते बोलत होते.

संस्कृती व परंपरांशी नाळ तुटू नये
शहरातील जामनेर रोड, हॉटेल प्रिमीयरमागील श्री संत सेना महाराज सभागृहात सोमवार, 28 रोजी भूलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन मंत्री संजय सावकारे यांनी केले. यावेळी मार्गदर्शनात मंत्री सावकारे यांनी भूलाबाईच्या पारंपरिक उत्सवातून जपल्या जाणार्‍या सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी असलेली नाळ तुटता कामा नये. लोकपरंपरा या केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून त्या समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहेत, असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले. परंपरा जपणे ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी नसून नव्या पिढीला त्याचे महत्त्व समजावून देणे आणि या परंपरांमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे हीदेखील समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा नारखेडे, बियाणी एज्युकेशन संस्थेच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, भुसावळ शहरातील नगरसेविका, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, केशवस्मृतीच्या प्रतिनिधी रेखा कुलकर्णी व स्वाती मॅडम आदींची उपस्थिती होती.

उत्कृष्ट नियोजनातून सांस्कृतिक कार्याला नवी दिशा
भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे व डॉ.संगीता बियाणी म्हणाले की, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन आणि त्यामागील सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोन खरोखरच कौतुकास्पद आहे. वर्षभर विविध क्षेत्रांतील कला, संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देत समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम मंडळ सातत्याने करीत आहे.
विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमधून आपल्या समृद्ध परंपरांचे जतन आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक उपक्रमामागे असलेली मेहनत, नियोजनबद्धता आणि समाजहिताची भावना निश्चितच कौतुकास्पद आहे.

घरोघरीची भूलाबाई आता महोत्सवातून जपण्याची गरज : रजनी सावकारे
पूर्वी भूलाबाईची स्थापना घरोघरी करून पारंपरिक पद्धतीने गाणी म्हटली जात होती मात्र बदलत्या काळात ही परंपरा हळूहळू कमी होत असून रेकॉर्डेड गाण्यांचा वापर वाढला आहे त्यामुळे नव्या पिढीपर्यंत ही लोकपरंपरा पोहोचविण्यासाठी संस्कृतीचे जतन व संवर्धन झाले पाहिजे, असे प्रतिपादन रजनी सावकारे यांनी प्रास्ताविकात केले. गेल्या अनेक वर्षांपासून भूलाबाईच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून ही परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टिपरी-ढोलकीच्या तालावर भूलाबाईचा जागर
भूलाबाई महोत्सवात पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत मुलींनी व महिलांनी टिपरी, ढोलकी व हार्मोनियमच्या साथीने भूलाबाईची गाणी सादर केली. खुल्या गटासाठी ‘भूलाबाई व श्रावण महिन्यातील सण’ ही संकल्पना ठेवण्यात आली होती. या उपक्रमात इयत्ता पहिलीपासून ते 75 वर्षांपर्यंतच्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पारंपरिक कला व लोकपरंपरेचा जागर केला.

भुसावळ तालुक्यातील 28 संघांनी नोंदवला सहभाग
भुलाबाई महोत्सवात शहर व ग्रामीण भागातील तब्बल 28 संघांनी सहभाग नोंदवला. प्रथम विजेत्या संघाला 5100, द्वितीय 3100 व तृतीय 2100 तर उत्तेजनार्थ 1100 रुपयांचे बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

असे आहेत स्पर्धेतील विजेते-
मोठा गट- प्रथम- महात्मा गांधी स्कूल, साकेगाव, द्वितीय- पुंडलिक बर्हाटे विद्यालय, भुसावळ, तृतीय- अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ व उत्तेजनार्थ शारदा विद्यालय, वरणगाव

खुला गट- प्रथम- शिवशक्ती ग्रुप, द्वितीय- आनंदी ग्रुप, तृतीय- मातोश्री ग्रुप व उत्तेजनार्थ नेवे समाज

छोटा गट- प्रथम- तु.स.झोपे स्कूल, भुसावळ, द्वितीय- दादासाहेब स्कूल, सुनसगाव, तृतीय- एन.के.नारखेडे स्कूल, भुसावळ व उत्तेजनार्थ
जिल्हा परिषद शाळा, वरणगाव

यांनी पाहिले परीक्षक म्हणून काम
दरम्यान, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकेश खपली, योगेश साळशिंगी, स्नेहा लढ्ढा, रुपा अग्रवाल आदींनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी करीत आभारही मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !