यावल शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर : नगराध्यक्षा छायाताई पाटील


यावल (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : यावल शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शेळगाव बॅरेज पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगराध्यक्षा छाया पाटील यांच्यासह सत्ताधारी गटाकडून गुरुवारी पाहणी करण्यात आली. काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले मात्र नगरसेवक अतुल पाटील यांनी नगरपालिकेला 10 कोटींचा निधी या योजनेसाठी मिळणार होता मात्र झारीतील शुक्राचार्यांमुळे तो मिळालाच नसल्याचे सांगितले. तरीही वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

56 कोटींच्या निधीला मान्यता
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरासाठी मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 56.03 कोटी निधीच्या या योजनेला 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. कामासाठी कंत्राटदारांना 23 मे 2025 रोजी कार्यादेश दिला. या योजनेचा उद्भव तापी नदीकाठी शेळगाव बॅरेज येथे टाकरखेडा गावाजवळ घेतला आहे. तेथे पाच मीटर व्यासाची एक इन्टेक वेल, दोन इन्स्पेक्शन वेल व आठ मीटर व्यासाचे जॅकवेल, 200 मीटर अप्रोच बंड तसेच 600 मीटरचा अ‍ॅप्रोच रोड घेण्यात येणार आहे. नदीचे पाणी इन्टेक वेलच्या माध्यमातून जॅकवेल मध्ये टाकण्यासाठी 600 मि.मी. व्यासाची पाइपलाइन करण्यात येत आहे. अ‍ॅप्रोच बंडचे काम पूर्ण झाले आहे. जॅकवेल व इन्टेक वेलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जॅकवेलचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पाठवण्यासाठी 250 एचपीचा पंप व विजेचा खर्च वाचवण्यासाठी 190 केव्हीचा सोलर प्लांट बसवण्यात येत आहे. जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र 400 मि.मी. व्यासाच्या 8 किमी पाइपलाइन पैकी 4.10 किमी काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

21 किमीचे काम पूर्ण
योजनेत 11 दशलक्ष लीटर क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, प्री-सेटलिंग टँक, बॅक वॉशिंग यंत्रणा,संकुचित हवेने फिल्टर बेड साफ करण्याची यंत्रणा, पूर्ण प्रवाह संपवेल मधून पाण्याचा पुनर्वापर, शुद्ध पाणी संपवेल मधून 60 एचपीने 22 लक्ष लिटरच्या साने गुरुजी जलकुंभात व 50 एचपीने 10 लक्ष लिटरच्या श्रीराम नगर जलकुंभात सोडले जाईल. केंद्रावर 120 केव्हीचा सोलर प्लांट आहे. केंद्राचे 45% काम व 57 किमी वितरण वाहिनीपैकी 21 किमी काम पूर्ण झाल्याची माहिती नगराध्यक्षा छायाताई पाटील यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या पाहणी प्रसंगी नगराध्यक्षा छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील, पराग सराफ, सागर चौधरी, उमर कच्छी, काँग्रेसचे शहर प्रमुख मो.हकीम मो.याकुब, उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद कोळी, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, दादू धोत्रे, उबाठाचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, करीम मन्यार, संतोष धोबी, योगेश पाटील, पप्पू जोशी, फारुख हाजी, नरेंद्र शिंदे, भूषण खैरे, किशोर माळी यांच्यासह योजनेचे कंत्राटदार व अभियंता उपस्थित होते.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !