मंत्री एकनाथराव खडसेंच्या फार्म हाऊसवर ड्रोनद्वारे रेकी : जळगावातील पोलिसांकडे चौकशीची मागणी


मुक्ताईनगर (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) :  माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहावरील ‘खडसे फार्म’ या फार्महाऊसवर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवून रेकी व चित्रीकरण केल्याचा प्रकार 28 सप्टेंबर 2026 रोजी घडला. घडल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

जळगाव पोलीस उपअधीकांना निवेदन
आमदार एकनाथराव खडसे यांनी यासंदर्भात जळगावच्या पोलीस उपअधीक्षकांना पत्र दिले आहे. फार्महाऊसवर रात्रीच्या वेळी विनापरवाना ड्रोन उडवून परिसराचे चित्रीकरण करण्यात आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या रेकीमागील उद्देशाचा तपास होणे आवश्यक आहे.

वॉचमनने टीपला व्हिडिओ
घटना घडली त्यावेळी आमदार एकनाथराव खडसे हे मुंबई येथे होते मात्र त्यांच्या फार्महाऊसवर सुरक्षेसाठी असलेल्या वॉचमनच्या निदर्शनास रात्रीच्या वेळी संशयास्पद पद्धतीने ड्रोन उडताना आले. त्याने तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये ड्रोनच्या हालचालींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवल्याने तपास करताना हे चित्रीकरण महत्त्वाचा पुरावा ठरू शकते, असे खडसे यांनी पोलिसांना कळविले आहे. रात्रीच्या वेळी कोणतीही परवानगी नसताना फार्महाऊसच्या परिसरात ड्रोन उडविणे आणि त्याद्वारे रेकी किंवा चित्रीकरण करणे ही बाब संशयास्पद असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. ड्रोन नेमका कोणत्या व्यक्तीने उडविला, तो कुठून नियंत्रीत करण्यात आला, चित्रीकरणाचा उद्देश काय होता आणि त्यामागे अन्य कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वी खडसेंचा फोन टॅप
यापूर्वीही आपल्या परवानगीशिवाय मोबाईल फोन 62 दिवस बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी मुंबईतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तथापि, या शंकेची वस्तुनिष्ठ पडताळणी तपासातूनच होणे अपेक्षित आहे. वारंवार घडत असल्याचे सांगितलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर फार्महाऊसची सुरक्षा आणि संबंधित व्यक्तींच्या हालचालींची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ड्रोन उडविणार्‍या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच तपासातून समोर आलेल्या निष्कर्षांची माहिती आपल्याला देण्यात यावी, अशी विनंती आमदार खडसे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

चर्चांना आले उधाण
ड्रोन शुटींगमुळे मुक्ताईनगरमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे. ड्रोनचे चित्रीकरण, त्याचा वापर करणारी व्यक्ती आणि या प्रकारामागील नेमका उद्देश तपासातून स्पष्ट होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !