आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात उद्या जळगावात जनआक्रोश महामोर्चा : विनोद सोनवणे


भुसावळ (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातींच्या आरक्षणात प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव जिल्हा’तर्फे रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी दोन वाजता जळगावात जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शिवतीर्थ मैदान (छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, कोर्ट चौक) येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांना सहभागाचे आवाहन
रविवारी शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विनोद सोनवणे यांनी अनुसूचित जातींच्या 59 जातींची एकता कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. महामोर्चात आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, प्रा.जोगेंद्र कवाडे, बबनराव घोलप, चंद्रकांत हंडोरे, दीपक केदार यांच्यासह विविध संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या मागण्यांसाठी मोर्चा
महामोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या 59 जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण किंवा बदल करू नये, आरक्षणाला आर्थिक निकष लागू करू नयेत, उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या बदर समितीचा अहवाल अमान्य करावा, तसेच 59 जातींची स्वतंत्र जनगणना करावी, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय खासगी उद्योग व संस्थांमध्ये आरक्षण लागू करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आणि अनुसूचित जातींच्या नोकर्‍यांमधील अनुशेष तातडीने भरणे या मागण्यांचाही समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला जिल्हा नेते दिनेश इखारे, रिपब्लिकन महिला सेना जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, गणेश जाधव, विक्रांत नरवाडे, सचिन बार्‍हे, सागर गाढे, लिलाधर सपकाळे, रमेश सावळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !