स्वर्गीय स्वप्नील ललवाणी स्मृती दिनानिमित्त कुर्हेपानाचे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे : डॉ.जगदीश पाटील
भुसावळ (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : स्व.स्वप्नील ललवाणी यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना देण्यात येणारी वही ही केवळ शैक्षणिक साहित्य नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिलेली साथ आहे. या वहीच्या पानांवर विद्यार्थ्यांचे अक्षर, ज्ञान, विचार आणि भविष्यातील यशाची कहाणी लिहिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून मनापासून अभ्यास करावा, वाचनाची सवय लावावी, प्रश्न विचारावेत आणि मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
कुर्हेपानाचे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ. दिलीप ललवाणी यांचे चिरंजीव स्व.स्वप्नील ललवाणी यांच्या पवित्र स्मृतीदिनानिमित्त ललवाणी फाऊंडेशन संचलित स्व.स्वप्नील स्मृती गोकुळग्राम यांच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रमोद आठवले, जिल्हा परिषद मराठी शाळेचे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष गणेश शिंदे, सदस्य प्रमोद उंबररकर, सेवानिवृत्त एस.टी.कर्मचारी विकास चौधरी, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य युसूफ शेख आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष तायडे यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका सांगितली. प्रमोद उंबरकर यांनी शैक्षणिक साहित्याचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले. विकास चौधरी यांनी शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्व.स्वप्नील ललवाणी यांच्या स्मृतीला केवळ अभिवादन न करता त्यांच्या स्मृतीतून सामाजिक व शैक्षणिक कार्याला चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा उपक्रम याच सेवाभावी भावनेचा भाग असल्याचे डॉ. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
शिक्षण हेच भविष्य घडविण्याचे साधन : प्रमोद आठवले
सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रमोद आठवले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे नियोजन, वाचन आणि चांगले संस्कार यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून स्वतःच्या क्षमता ओळखाव्या आणि भविष्यात समाजासाठी उपयुक्त नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी स्व. स्वप्नील ललवाणी यांच्या स्मृतीला शिक्षण आणि समाजसेवेची जोड देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करून करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद दिसून येत होता.
सूत्रसंचालन संतोष तायडे तर आभार मेघ:श्याम सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष तायडे, मेघ:श्याम सपकाळे, शालिनी चौधरी, अनिता धनराळे, शारदा मसाने, शबाना परवीन, मोहम्मद साहील, समीना पटेल, अमरिश शेख, ललवाणी फार्मचे कर्मचारी गोलू राऊत, ईश्वर तोरे आदींनी परिश्रम घेतले.


