पत्नीस काचेची बाटली मारल्याच्या आरोपातून वढोद्यातील पतीची निर्दोष मुक्तता
भुसावळ (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : कौटूंबिक वादाचे प्रकरण सुरू असतानाच भुसावळातील अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या गेट नंबर एक जवळ पतीने पत्नीस काचेची बाटली मारून जखमी करीत, शिविगाळ केल्याचा आरोप होता व या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. वढोदा, ता.मलकापूर येथील संशयीत पतीविरोधात कुठलाही पुरावा सादर न झाल्याने संशयीताची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
असे आहे प्रकरण ?
वरणगावातील रहिवासी चंदना दीपक तायडे व पती दीपक तुळशीराम तायडे यांचेत वैवाहिक वाद न्यायालयात सुरू होते. 12 जानेवारी 2018 रोजी भुसावळ कोर्टातील गेट नंबर एकजवळ फिर्यादी चंदना यांना पती दीपक तायडे (62) याने काचेची बाटली तीच्या गालावर मारून जखमी केले, अशी तक्रार महिलेने भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दिली होती.

याप्रकरणी भुसावळ न्यायालयात महिलेला पती दीपक तायडे (वढोदा, ता.मलकापूर) विरुद्ध पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केले होते. अभियोग पक्षाने एकूण पाच साक्षीदार या प्रकरणात तपासले मात्र अभियोग पक्षास संशयीताविरुध्द गुन्हा शाबीत करता न आल्याने तायडे याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयीत दीपक तायडेतर्फे ज्येष्ठ वकील अॅड.नितीन खरे यांनी काम पाहिले.
