बोगस शिक्षक भरती घोटाळा : तराळ विद्यालयाचा शिपाई अमोल कुळकर्णीला इंदूर महामार्गावरून अटक !

नाशिक आर्थिक गुन्हे शाखेची मध्यरात्री कारवाई ; संशयास्पद कमाईतून खरेदी केलेली चारचाकी जप्त


जळगाव (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील संशयित अमोल रमेश कुळकर्णी उर्फ शंभू याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 16 ऑक्टोबर रोजी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने इंदूर महामार्गावर सापळा रचून मध्यरात्री त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून संशयास्पद कमाईतून खरेदी केल्याचा संशय असलेली चारचाकी गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे.

दोन कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तडवी विद्यालय आणि मंगू रामजी महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये 2014 ते 2017 या कालावधीत कागदोपत्री बेकायदेशीर शिक्षक भरती दाखवून शासनाची दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततांचा तपास सुरू आहे.

शिपाई असलेला कुलकर्णी तराळांचा राईट हॅण्ड
अमोल कुळकर्णी हा कागदोपत्री शाळेत शिपाई पदावर कार्यरत होता. मात्र, प्रत्यक्षात संस्थाध्यक्ष विनोद तडवी यांचा तो उजवा हात मानला जात असल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेची प्रशासकीय सूत्रे आणि आर्थिक देवाणघेवाण त्याच्या हातात असल्याचे आरोप आहेत. संस्थेच्या कामकाजात त्याचा मोठा हस्तक्षेप असल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकांनाही त्याच्यासमोर जुमानावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या. उलट, शिक्षकांशी अरेरावी केली जात असल्याने शिक्षकवर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.

तपास यंत्रणांकडून पुढील तपास सुरू
न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनासह आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे संबंध आहेत आणि शासनाच्या निधीचा कथित गैरवापर कसा झाला ? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या घोटाळ्यातील इतर संशयितांची भूमिका आणि आर्थिक व्यवहारांबाबत तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !