दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा ; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळी-वेगळी दिवाळी !

ना शासकीय थाट, ना औपचारिकता ; बंजारा बांधवांच्या सुखदुःखात सहभागी होत पालकमंत्र्यांनी जपले आपुलकीचे नाते !


धरणगाव (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे दिवाळीचा सण ! अशा परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची आपली परंपरा जपत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी धरणगाव तालुक्यातील पोखरी या बंजारा तांड्यात ग्रामस्थांसोबत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. कोणताही शासकीय थाटमाट न करता बंजारा समाजातील माता-भगिनी, वडीलधारी मंडळी आणि चिमुकल्यांच्या सान्निध्यात बसून त्यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. दुष्काळामुळे चिंतेत असलेल्या ग्रामस्थांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. पालकमंत्र्यांच्या या आपुलकीच्या भेटीने पोखरी तांड्यात दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

बंजारा संस्कृतीचे दर्शन ; पारंपरिक पद्धतीने स्वागत
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोखरी तांड्यात आगमन होताच पारंपरिक वेशभूषेतील बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी महिला व पुरुषांनी एकत्र येत पारंपरिक बंजारा व पावरा गीतांवर नृत्य सादर केले. गीत-संगीत आणि पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले. माता-भगिनींचा उत्साह, चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि ग्रामस्थांचा स्नेह पाहून पालकमंत्रीही भारावून गेले. त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.









एकाच पंगतीत फराळ ; आपुलकीचे नाते झाले अधिक दृढ
विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांसोबत एकत्र बसून दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. मंत्री म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून ते ग्रामस्थांमध्ये मिसळले. सणासुदीच्या काळात आपल्या तांड्यात येऊन पालकमंत्री आपल्यासोबत दिवाळी साजरी करत असल्याचा आनंद ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होता.

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीची ग्वाही
यावेळी ग्रामस्थांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यंदा पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीव्यतिरिक्त आणखी आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली. त्यावर शासन नक्कीच शेतकर्‍यांना मदत करेल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘ही दिवाळी माझ्याच कुटुंबासोबत साजरी केल्याचे समाधान!’
दिवाळी हा केवळ आनंदाचा सण नसून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा सण आहे. यंदा दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. अशा काळात आपल्या माणसांसोबत राहणे महत्त्वाचे आहे. पोखरी तांड्यातील माता-भगिनी, वडीलधारी मंडळी आणि चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करताना आपल्याच कुटुंबात सण साजरा केल्याचे समाधान मिळाल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच गोकुळ पंडित शिंदे, उपसरपंच नवल हेमलाल पारधी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, संतोष भीम वंजारी, किसन दिला राठोड, रामलाल प्रताप चव्हाण, इंदल रतन चव्हाण, धनराज बाळू राठोड, गुलाब पेला चव्हाण, पांडुरंग ओंकार चव्हाण, हिरालाल मानसिंग चव्हाण, ताराचंद प्रताप चव्हाण, गोविंदा गणपत सोनवणे, रवी सर अंजन विरे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंजारा समाजातील महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !