आदिवासी बांधवांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी साजरी केली दीपावली
बोरमळीत जलसंपदामंत्री यांचा सहपरिवार दिवाळी उत्सवात सहभाग : फराळ वाटप व स्नेहभोजनातून जपली माणुसकीची नाती
धरणगाव (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : दीपावली हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावल तालुक्यातील बोरमळी येथे आदिवासी बांधवांसोबत सहपरिवार, सहकुटुंब दीपावली साजरी केली.
आदिवासी पाड्यावर फराळाचे वाटप
यावेळी आदिवासी पाड्यावरील बंधू-भगिनींना मंत्री गिरीश महाजन हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या भेटीला गेलेल्या महाजन यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. फराळ वाटपाच्या माध्यमातून केवळ सणाचा आनंदच नव्हे, तर आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा भावही त्यांनी जपला. यावेळी उपस्थितांच्या चेहर्यावरील आनंद, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेमळ संवादामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.








आनंदाचा व समाधानाचा भाव
समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदावी, हीच या दीपोत्सवामागील भावना असल्याचे यावेळी दिसून आले. माणुसकीचे नाते जपत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सण साजरा करण्याचा त्यांचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आनंददायी ठरला. आदिवासी बांधवांसोबतच्या या स्नेहपूर्ण सहवासा मुळे त्यांच्या चेहर्यावर आनंदाचा व समाधानाचा भाव दिसून आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार अमोल जावळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच आदिवासी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.