धुळ्यानजीक बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त : तिघांना अटक


 

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त : धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई

धुळे : तालुक्यातील आनंदखेडेनजीक शेतात बनावट दारू कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व पथकाला मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकत बनावट दारू कारखाना नष्ट करीत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आली. गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर आनंदखेडा-उडाणे रस्त्यावरील राजेंद्र पवार यांच्या शेतातून विशाल विनायक वाघ (रा.कृषी नगर, संगमा चौक, धुळे), हर्षेश बळवंत सूर्यवंशी (रा.शिवकॉलनी अभय कॉलेज जवळ धुळे) व रवींद्र धना पवार (आनंद खेडा) या तीन आरोपींना अटक करण्यात आली.

चार लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त
शेतातून पोलिसांनी देशी-विदेशी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन, रीकाम्या काचेच्या बाटल्या, बुच, बाटली सील करण्याचे मशीन, मॅकडॉल नंबर वन कंपनीच्या तसेच रॉयल्स स्टॅग कंपनीची बनावट दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीटचे भरलेले ड्रम, दारूचे प्रमाण मोजण्याची तापमापी, सेंट च्या बाटल्या, रंगाच्या बाटल्या बनावट दारू ठेवण्यासाठी केलेले बनावट खोके, एक्वा वॉटरने भरलेले ड्रम तसेच एक मोटर सायकल असा एकूण 4 लाख 82 हजार 186 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चेतन चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
तालुक्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मोरे, प्रवीण पाटील, चेतन चव्हाण, भूषण पाटील, धीरज सांगळे, राकेश महाले यांच्या पथकाने आनंदखेडा शिवारातील उडाने राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !