अमळनेरातील कत्तलखान्यावर कारवाई : 570 किलो मांस, 50 किलो कातडी जप्त
अमळनेर (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेत अमळनेर पोलिसांनी कत्तलखान्यात छापा टाकून 570 किलो विविध जनावरांचे मांस, 50 किलो कातडी आणि हत्यारांसह सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, 16 रोजी पहाटे शहरातील पारधीवाडा कत्तलखान्यात करण्यात आली. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले. अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कत्तलखान्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी निर्देश दिल्यानंतर सोमवार, 16 रोजी पहाटे चार वाजता पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे, विनोद भोई, विनोद सोनवणे, नितीन मनोरे, विनोद संदानशीव, मंगल भोई यांनी कारवाई केली.
45 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलीस येताच ईकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी पसार झाले. 18 हजार रुपयांचे 300 किलो गोवंश जातीचे मांस, सहा हजार रुपये किंमतीचे 100 किलो म्हशीचे मांस तसेच 170 किलो मांस, शिंगे, कातडी, 28 कुर्हाडी, सुर्या व कोयते मिळून 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या संशयीतांविरोधात कारवाई
शेख रमजान शेख मुख्तार, अब्दुल अजीज अब्दुल शकुर, अल्ताफ खा अजीज खा पठाण, सलमान रजा सलीम अहमदखान, शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला (सर्व रा.फरशी रोड, अमळनेर), इकबाल कुरेशी व बाबा कुरेशी (अमळनेर) हे संशयीत आढळले. पोलिसांनी सर्व मांस, हाडे, कातडी ,शिंगे जप्त करून नगरपालिकेच्या कर्मचार्यांच्या मार्फत मोठा खड्डा करून त्यात पुरून नाश केला व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत. दरम्यान पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
