अजित पवार अपघात प्रकरणाला नवे वळण ; रोहित पवारांकडून मुख्यमंत्र्यांचा ‘मफलर मॅन’ म्हणून उल्लेख : व्हीएसआर कंपनीच्या परदेशातील मालमत्तेवर गंभीर आरोप
मुंबई (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. अपघाताला साडेनऊ महिने उलटूनही चौकशीचा अंतिम अहवाल जाहीर झालेला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीचे मालक, त्यांच्या कथित परदेशी मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबत अनेक गंभीर दावे केले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ’मफलर मॅन’ म्हणून उल्लेख करत संबंधितांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोपही केला.
‘मफलर मॅन’ म्हणून फडणवीसांचा फोटो दाखवला
पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मफलर परिधान केलेला फोटो दाखवला. हा फोटो व्ही. के. सिंग यांचे पुत्र रोहित सिंग यांच्या विवाह सोहळ्यातील असल्याचा दावा त्यांनी केला. या विवाह सोहळ्याला अनेक राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असल्याचे सांगत त्यांनी काही व्हिडिओही सादर केले.
अपघाताशी थेट संबंध नाही
फडणवीस यांचा अजित पवार यांच्या विमान अपघाताशी थेट संबंध असल्याचा आरोप आपण करत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. व्हीएसआर कंपनीच्या मालकाला कोणाकडून संरक्षण मिळत आहे? हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित व्यक्तींमधील कथित जवळीकीवरून सरकारला लक्ष्य केले. व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.
व्हीएसआर कंपनीच्या परदेशातील मालमत्तेचा दावा
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या परदेशातील संपत्तीचा मुद्दा उपस्थित केला. राहुल सिंग यांच्याकडे गोल्डन व्हिसा असल्याचा दावा करत दुबईमध्ये कंपनीची नोंदणी आणि दोन विमानांच्या मालकीसंदर्भात माहिती सादर केली. याशिवाय, ग्लोबल 500 प्रकारच्या विमानाची किंमत सुमारे 150 कोटी रुपये असल्याचे सांगत या विमानाचा संबंध हैदराबादमधील ‘विश्वसमुद्र’ कंपनीशी असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित कंपनीचे तेलंगणातील मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचेही त्यांनी म्हटले. या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
अमेरिकेतील कोट्यवधींच्या गाड्या आणि विमानाचा उल्लेख
व्हीएसआर संबंधित व्यक्तींकडे कोट्यवधी रुपये किंमतीच्या महागड्या गाड्या असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, साडेनऊ कोटी, साडेसात कोटी, साडेचार कोटी आणि अडीच कोटी रुपये किमतीच्या गाड्या रोहित सिंग, राहुल सिंग आणि व्ही. के. सिंग यांच्याशी संबंधित आहेत. या गाड्या भारतात नसून अमेरिकेत असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी अमेरिकेत नोंदणीकृत असलेल्या एका विमानाचाही त्यांनी उल्लेख केला. या विमानाचा नोंदणी क्रमांक एन 29व्हीके असल्याचे सांगत त्यांनी ‘व्हीके’ या अक्षरांवर विशेष लक्ष वेधले. या विमानामागील कथित संबंधांबाबत पुढील पत्रकार परिषदेत अधिक माहिती देणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
अजित पवारांच्या निधनानंतर दोन दिवसांत 18 कोटींचे घर?
रोहित पवार यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील एका आलिशान घराचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांच्या दाव्यानुसार, सुमारे 18 कोटी रुपये किंमतीचे हे घर अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अवघ्या दोन दिवसांनी खरेदी करण्यात आले. हे घर प्रसिद्ध अमेरिकन गायक कोडॅक ब्लॅक यांच्याकडून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवहाराची वेळ, घर खरेदी करणार्या व्यक्तींची ओळख आणि निधीचा स्रोत याबाबत प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली.
विमान अपघाताच्या तपासावरही प्रश्नचिन्ह
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना रोहित पवार यांनी विमानातील इंधन, ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. विमानात पुरेसे इंधन असल्याचा दावा करत ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती आणि अमेरिकेतील संबंधित संस्थेच्या तसेच ऊॠउ- च्या अहवालातील कथित अनियमिततांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अपघात होता की घातपात, याबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.
5.33 कोटींच्या व्यवहारांचा संशय
अजित पवार यांच्या अपघाताच्या आसपासच्या काळात समता पतसंस्थेतून 5 कोटी 33 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. 27 जानेवारी 2026 रोजी व्यवहारांसंदर्भात 17 मेसेज, तर 28 जानेवारी रोजी 19 मेसेज आल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवहारांची चौकशी करून त्यामागील आर्थिक व्यवहार स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शिवनिका ट्रस्टशी संबंधित व्यवहार आणि अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर कथित काळ्या जादूचा प्रकार घडल्याच्या माहितीवरही तपास यंत्रणांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
