चोरीचा संशय अन् अमानुष मारहाण ; ट्रॅक्टरला बांधून दोघांना बेदम चोप, एकाचा मृत्यू !
बीड (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : जुन्या दुचाकीच्या खरेदीसाठी आलेल्या दोन तरुणांवर चोरीचा आरोप करत त्यांना ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील वानगाव येथे घडली. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. संभाजी विश्वनाथ सारुक (38, रा. नांदगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
दुचाकी पाहण्यासाठी गेले अन् चोरीच्या आरोपातून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी सारुक आणि हर्ष विकास जाधवर हे दोघे रविवारी जुन्या दुचाकीची खरेदी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील नांदगाव येथून बीड जिल्ह्यातील वानगाव येथे आले होते. मुकादम अशोक कागदे याच्याकडील दुचाकी पाहण्यासाठी ते गेले असता, पवन रोमण आणि अन्य आरोपींनी त्यांच्यावर 50 हजार रुपये व मोबाइल चोरी केल्याचा आरोप केला.
या आरोपातून आरोपींनी दोघांना पकडून ट्रॅक्टरला बांधले. संभाजी यांना ट्रॅक्टरच्या नांगराला, तर हर्ष याला ट्रॅक्टरच्या बारपट्टीला बांधून पाच जणांनी पाइपाने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत संभाजी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
आईला केलेल्या फोनमुळे प्रकार उघडकीस
मारहाणीनंतर संभाजी बेशुद्ध अवस्थेत असताना हर्षने त्यांच्या मोबाइलवरून संभाजी यांच्या आई अनिता यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर सुमारे एक तासाने हर्षचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांची सुटका करून तातडीने धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.
दरम्यान, सोमवारी पहाटे येरमाळा पोलिसांनी या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
