रावेर पालिकेच्या सभेत अमृत योजनेला मुदतवाढीचा निर्णय : 37 विषयांना मंजुरी

सर्वसाधारण सभेत शॉपिंग कॉम्प्लेक्स, रस्ते, गटारी व सौरऊर्जा प्रकल्पावर चर्चा ; पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारला


रावेर (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : रावेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अमृत 2.0 योजनेतील कामाला मुदतवाढ देण्याच्या निर्णयासह नगरपालिकेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणे, शहरातील रस्ते व गटारींची कामे करणे तसेच नगरपालिकेच्या नवीन इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणे अशा एकूण 37 विषयांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, 17 रेजी सभा पार पडली. दरम्यान, सभेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना सभागृहात बसण्यास मज्जाव करण्यात आल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

37 विषयांना सभागृहात मंजुरी
सभेत शहरात सुरू असलेल्या अमृत 2.0 योजनेच्या कामांना मुदतवाढ देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नगरपालिकेच्या नवीन इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या विषयावरही चर्चा झाली. याशिवाय नगरपालिकेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणे, शहरातील विविध भागांत रस्ते व गटारींची कामे करणे आदी विकासकामांसह एकूण 37 विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. या सभेला मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्यासह नगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेच्या वार्तांकनासाठी पत्रकारांना मज्जाव
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी नेहमीप्रमाणे पत्रकार नगरपालिकेत आले मात्र यावेळी नगरपालिकेचे प्रशांत कोकाटे यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडून पत्रकारांनी सभेला उपस्थित राहू नये, असा निरोप असल्याचे सांगितले त्यामुळे वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना सभागृहात प्रवेश मिळू शकला नाही. लोकप्रतिनिधींच्या सभेचे कामकाज आणि शहराच्या विकासाशी संबंधित निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांना सभेच्या वार्तांकनाची संधी मिळणे आवश्यक असताना, त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने या प्रकाराबाबत पत्रकार वर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !