नंदुरबार गुन्हे शाखेने रोखली दारुची अवैध वाहतूक : चारचाकी वाहनासह आठ लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त !


धडगाव (मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2026) : नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. नंदुरबार गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चारचाकी वाहनासह तब्बल आठ लाख 15 हजार 648 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन लाख 15 हजार 648 रुपये किंमतीचे 96 बॉक्स बिअर व पाच लाख रुपये किंमतीची मॅक्स चारचाकी गाडी जप्त करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजकंटक आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातून अवैध दारूची चोरीछुपी वाहतूक होऊ नये, यासाठी सीमावर्ती भागात नाकाबंदी आणि गस्त वाढविण्यात आली आहे. रविवार, 15 नोव्हेंबर 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांना दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अभिषेक पाटील यांना कारवाईचे निर्देश दिले. रविवारी पथकाने धडगाव तालुक्यातील सोन ते कात्री रस्त्यावर मॅक्स चारचाकी (एम.एच.14 बी.सी.1961) वाहनाला अडवण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने पोलीस पाहताच काही अंतरावर वाहन उभे करीत पळ काढला.

आठ लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात तीन लाख 15 हजार 648 रुपये किंमतीचे 96 बिअरचे बॉक्स तसेच पाच लाख रुपये किंमतीचे वाहन (एम.एच.14 बी.सी.1961) मिळून एकूण आठ लाख 15 हजार 648 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार रंजन वाघ, पोलीस अंमलदार यशोदीप ओगले, विनोद पाटील यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !