नंदुरबारमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; तीन घरफोडीचे गुन्हे उघड

दोन आरोपींसह दोन अल्पवयीन ताब्यात : एक लाख 62 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त


नंदुरबार (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : नंदुरबार जिल्ह्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. वेगवेगळ्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपी आणि दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल एक लाख 62 हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

शहर हद्दीतील घरफोडी उघड
नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाली होती. चोरट्यांनी स्वामी समर्थ नगर, कोरीट नाका रोड भागातील तक्रारदाराच्या घरातून 62 हजार 500 रुपये रोख, चांदीचे दागिने व साड्या चोरून नेल्या होत्या. तपासादरम्यान हा गुन्हा परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर व त्याचा पुतण्या राजसिंग लखनसिंग शिकलीकर (म्हाडा कॉलनी, एकता नगर, नंदुरबार) यांनी केल्याचे स्पष्ट होताच त्यांना करकुपा चौकातून अटक करण्यात आली. आरोपींकडून 60 हजारांची रोकड जप्त करण्यात आली तसेच चोरीतील साड्या व दागिने काका परबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर यांच्याकडे दिल्याची कबुली दिली. अल्पवयीन बालकासह मुद्देमाल शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

अक्कलकुवा हद्दीतील गुन्ह्याची उकल
अक्कलकुवा हद्दीतील शीतपेय निर्मितीच्या गोदामातून 18 ते 20 सप्टेंबरदरम्यान फिलिंग मशीन, फिलिंग मशीन प्रेशर पंप, कॅनिस्टर टँक, होममेड प्रेशर व्हॉल्व्ह, ऑक्सिमिटर, श्रेडिंग बॅग, स्टील पाईप चोरीला गेले होते. या गुन्ह्याप्रकरणी रवी अनिल पाडवी (27) व मंगलसिंग दशरथ पाडवी (25, दोन्ही रा.सोरापाडा, डाबरा, ता.अक्कलकुवा) यांना अटक करण्यात आली. 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपींना अक्कलकुवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नवापूर हद्दीतील गुन्ह्याची उकल
नवापूर हद्दीतील दिनेश बापड्या मावची (39, करंजी ओवारा) हे मिस्तरी कारागीराच्या घरातून 14 रोजी चोरट्याने 25 हजारांची रोकड व 15 हजारांचा मोबाईल लांबवला होता. 17 रोजी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर नंदुरबार गुन्हे शाखेने अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. संशयीताकडून 12 हजारांची रोकड व 15 हजारांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हवालदार दिनेश चिते, जितेंद्र तांबोळी, मुकेश ताडे, योगेंद्र सोनार, दादाभाई माळूळ, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक चेतन साळवे, राहुल बोराळे, अभय राजपूत, मनोज भगवान, राहुल पांढारकर, भरत उगले, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, रोहिणी धनगर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !