भुसावळातील मतदार यादीतील 14 हजार 562 हरकतींच्या प्रश्नी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

एफआयआर नोंदवून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी


भुसावळ (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : भुसावळ विधानसभा मतदार संघात एआयआरमध्ये मतदारसंघातील 14 हजार 562 मतदारांविरुद्ध त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी फॉर्म- सातद्वारे 12 ऑक्टोंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने केवळ 186 जणांनी हरकती दाखल केल्या आहेत. एकाच दिवशी दाखल झालेल्या या हरकतीच्या प्रकरणी एफआयआर नोंदवून स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

तीन व्यक्तींच्या नावाने मिळून 463 हरकती दाखल
भारत निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार स्पष्ट निर्देश दिले आहेत की, एक वैयक्तिक मतदार दावे व हरकतींच्या संपूर्ण कालावधीत जास्तीत जास्त 10 फार्म सात चे अर्ज दाखल करू शकतो आणि ही मर्यादा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतींना लागू आहे. सदर निर्देश निर्गमित झाल्यानंतर केवळ तीन दिवसांनी भुसावळ हरकतींचा हा प्रकार घडला आहे. ज्यांच्या नावाने हे अर्ज दाखल झाले, त्यांच्यापैकी काही व्यक्तींनी स्वतःच ते अर्ज आपले नसल्याचे लेखी कळविले आहे. तीन व्यक्तींच्या नावाने मिळून 463 हरकती दाखल आहेत.अर्जदारांच्या नावाने प्रत्येक भागात नेमक्या 25 हरकतींचे एकसारखे गठ्ठे दाखल आहेत. मतदार यादीत आधीच नाव असलेल्या व्यक्तीचे नाव, त्यास नोटीस व म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय आणि ठोस पुराव्याशिवाय वगळता येत नाही. एकाच दिवशी, एकसारख्या गठ्ठ्यांमध्ये, 186 नावांनी इतके अर्ज दाखल होणे हे संघटित नियोजनाशिवाय शक्य नाही त्यामुळे यामागील सूत्रधारांचा शोध घेणे तसेच जबाबदार अधिकार्‍यांवरही कारवाई करावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

बनावट हरकतींच्या आधारे नाव वगळू नये
जळगाव जिल्ह्याबाहेरील वरिष्ठ अधिकार्‍यामार्फत या संपूर्ण प्रकाराची कालबद्ध चौकशी करण्यात यावी. हे अर्ज कोणी आणले, कोणत्या अधिकार्‍याने किंवा कर्मचार्‍याने स्वीकारले, त्यांची आवक नोंद व पोचपावत्या आहेत काय, आणि आयोगाची मर्यादा असताना ते का स्वीकारले गेले. मतदार यादीची शुद्धता व प्रत्येक पात्र नागरिकाचा मताधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. एकाही पात्र मतदाराचे नाव बनावट हरकतीमुळे वगळले जाऊ नये, यासाठी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून निष्पक्षपणे कारवाई करा, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रात म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !