जळगावात टीप सोन्याच्या बिस्किटांच्या तस्करीची ! कारवाईत आढळली साडेसात लाखांची संशयास्पद रोकड

जळगाव वाहतूक शाखेची मोठी कारवाई ; अडावदच्या दोघांना अटक


जळगाव (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : जळगाव शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई सुरू केली असतानाच यंत्रणेला सोन्याच्या बिस्कीटांची वाहनाद्वारे तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. खातरजमा करण्यासाठी यंत्रणेने धाव घेत एका बुलेटवरील दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंगझडतीत तब्बल साडेसात लाखांची रोकड आढळली. बुलेटसह 10 लाख 95 हजार 120 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अडावद, ता.चोपडा येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत शिस्त निर्माण व्हावी तसेच अपघातांना आळा बसावा, या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहतूक शाखेला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत जळगाव शहरात काही इसम संशयास्पदरीत्या बुलेट घेऊन फिरत असून त्यांच्या पार्सलमध्ये सोन्याचे बिस्कीट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल इरफान रहिम बेग व पोलीस कॉन्स्टेबल मंगेश नथू साळुंखे यांनी तपास सुरू केला.

साडेसात लाखांची रोकड
सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 8.20 वाजता ममुराबाद रोड, जळगाव येथे बुलेट मोटारसायकलवरून प्रवास करणार्‍या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांनी आपली नावे हरीष राजेंद्र महाजन (30) व सुजित गोकुळ महाजन (26, रा.मंदिरा, अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव) असल्याचे सांगितले. संशयीताकडील पार्सल तपासल्यानंतर त्यात साडेसात लाखांची रोकड आढळली तसेच अडीच लाखांची बुलेट (एम.एच.19 ई.यु.1884), 65 व 28 हजार रुपये किंमतीचे मोबाईल, दोन हजार 120 रुपयांची रोकड मिळून एकूण 10 लाख 15 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयीताविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंडाम यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी इम्रान रहिम बेग व मंगल नथ्थू साळुंखे आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !