लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत अफवांपासून सावध राहा !

सोशल मीडियावरील अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका ; आर्थिक फसवणुकीचा धोका


जळगाव (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या अफवांपासून लाभार्थी महिलांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे संदेश तसेच काही अनधिकृत लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र,शासन स्तरावरून ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतेही नवीन निर्देश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या अशा लिंकवर विश्वास ठेवू नये.

कोणत्याही अनोळखी किंवा अनधिकृत लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील अथवा अन्य गोपनीय माहिती भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा लिंकच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जळगाव जिल्हा महिला बालविकास अधिकार्‍यांनी माध्यमांद्वारे कळवले आहे.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेबाबत शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत अधिकृत सोशल मीडिया माध्यमे तसेच वृत्तपत्रांद्वारे लाभार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे शासनाची अधिकृत सूचना येईपर्यंत कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अनधिकृत लिंकपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !