मेहुणबारेत 50 लाखांच्या विमा रकमेसाठी बनावट अपघाताचा कट ; चाळीसगावच्या चार पोलीस कर्मचार्‍यांसह वैद्यकीय अधिकारी, एजंट मिळून 10 जणांविरुद्ध गुन्हा


गणेश वाघ
चाळीसगाव (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून बनावट साक्षीदार तयार करणे, अपघाताबाबत खोटी माहिती देणे आणि विमा कंपनीकडून लाखो रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी कट रचल्याचा गंभीर प्रकार अलीकडे उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात चार पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, खासगी एजंट यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात 50 लाखांचा क्लेम करून चौकशी सुरू होताच तो मागे घेण्यात आला तर विमा कंपनीच्या डेबीट कार्डद्वारे 10 लाखांची फसवणूक करण्यात आली.

विमा कंपनीला लुबाडण्यासाठी कट
राजेंद्र शालिंदर जाधव (रा. पाथीमांगे, ता. मालेगाव) यांचा 23 फेब्रुवारी 2024 रोजी नैसर्गिक मृत्यू झाला मात्र यानंतर आरोपींनी संगनमताने योजना आखत जाधव जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावावर विविध विमा कंपन्यांच्या पॉलिसी काढल्या. त्यानंतर 19 एप्रिल 2025 रोजी दहिवद फाट्याजवळ अपघात झाल्याचा बनाव रचून जाधव यांचा मृत्यू अपघातात झाल्याचे दाखवण्यात आले. या आधारावर श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीसह इतर 10 विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईचा दावा सादर करण्यात आला. मेहुणबारे पोलिसांनी या प्रकरणाचा अलीकडेच पर्दाफाश करीत या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी, भाऊ, डॉक्टर आणि पोलीस कर्मचार्‍यांसह एकूण 9 जणांना अटक केली होती. याप्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी किरण रावसाहेब शिंदे यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात त्यावेळी फिर्याद दाखल केली.

दुसर्‍यांदा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
मेहुणबारे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, विमा क्लेमसाठी रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून आरोपींनी संगनमताने बनावट साक्षीदार तयार केले. त्यानंतर अपघाताबाबत खोटी माहिती देऊन विमा कंपनीची दिशाभूल केली. या कटातून विमा कंपनीकडून 50 लाख रुपयांचा विमा दावा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी कविता पाटील यांनी क्लेम मागे घेतला तर फिर्यादीच्या विमा कंपनीच्या डेबिट कार्डचा वापर करून 10 लाख रुपये लुबाडण्यात आल्याचे तपासात समोर आले.

पोलीस कर्मचारी खात्यातून रिमूव्ह : चौकशी अहवाल येताच गुन्हा
चाळीसगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी या प्रकरणाची चौकशी करीत पोलीस अधीक्षकांकडे गुरुवारी अहवाल दिल्यानंतर मेहुणबारे पोलिसात दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात चार पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि एजंटचाही समावेश आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये नितेश हिंमत पाटील (रा.एरंडोल), आकाश सुनील पाटील (रा.जुवार्डी, ता.भडगाव), प्रेमचंद त्र्यंबक पाटील (रा.एरंडोल), कविता संजय पाटील (रा.एरंडोल, जि.जळगाव), हवालदार रवींद्र एकनाथ बतीसे (तत्कालीन नेमणूक मेहणुबारे), वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार करंबेळकर, खासगी एजंट प्रवीण मयाराम पाटील (रा.पारोळा), नाईक महेंद्र प्रकाश पाटील (तत्कालीन नेमणूक मेहणुबारे), हवालदार सचिन अशोक निकम (तत्कालीन नेमणूक मेहणुबारे) व सुनील अशोक निक (तत्कालीन नेमणूक चाळीसगाव शहर पोलीस) यांचा समावेश आहे.

रॅकेट उघडकीस : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
अटकेतील आरोपींनी यापूर्वी अशा पद्धत्तीने बनावट क्लेम पास होण्यासाठी काही मदत केली आहे का? संशयीत आरोपींकडे आतापर्यंत असलेल्या एकूण तपासातील गुन्ह्यांमध्ये त्यांनी अशाच पद्धत्तीने काही मदत केली का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून तपासात अनेक बाबी निष्पन्न होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बनावट अपघात, खोटे साक्षीदार आणि विमा कंपनीची फसवणूक करण्याच्या या कथित कटामुळे पोलीस यंत्रणेसह विमा क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. आता या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !