कोविड काळात 17 कोटी 72 लाखांचा भ्रष्टाचार : तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाणांसह सात जणांविरोधात गुन्हा
जळगाव (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालयासाठी दैनंदिन वापराकरिता आवश्यक असलेल्या साहित्य खरेदी प्रक्रियेत तब्बल 17 कोटी 72 लाख 67 हजार 964 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जळगावचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व संस्थांच्या प्रतिनिधींसह सात जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ.मनोज मंगल पाटील (49) यांनी या संदर्भात सरकारतर्फे यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपसंचालक आरोग्यसेवा, नाशिक मंडळ यांच्या 12 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्राच्या आणि चौकशी अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांमध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव शिवाजीराव चव्हाण, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.यू.बी. तासखेडकर, तत्कालीन लेखा अधीक्षक हरीपाल आर.वाणी, तत्कालीन अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे, तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबूलाल भंगा बारेला, यावल ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन सहाय्यक अधीक्षक सुधाकर दगडू चोपडे, मे.गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष (नांदूर, मांडसांगवी, जि.नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
2020 ते 2022 या कालावधीतील खरेदी प्रक्रियेची चौकशी
फिर्यादीनुसार, 16 ऑक्टोबर 2020 ते 25 मे 2022 या कालावधीत जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले होते. या खरेदी प्रक्रियेत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित साहित्य खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे, आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेणे आणि खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे अपेक्षित होते. मात्र, या प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने खरेदी करून शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
17 कोटी 72 लाखांचा आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवर्यात
एफआयआरमधील मालमत्तेच्या तपशिलानुसार, कार्यालयीन व रुग्णालयीन दैनंदिन वापरासाठी लागणार्या किरकोळ व इतर वस्तूंच्या खरेदीशी संबंधित 17 कोटी 72 लाख 67 हजार 964 रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवर्यात आहे. या खरेदी प्रक्रियेत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
यावल पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या साहित्य खरेदी प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
