नोटा बदलण्याच्या बहाण्याने बचत गटातील जामनेरच्या महिलेला 20 हजारांचा गंडा
जामनेर (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : बचत गटासाठीचे पैसे काढून बँकेबाहेर पडलेल्या 50 वर्षीय महिलेला बोलण्यात गुंतवत दोन भामट्यांनी 19 हजार 500 रुपयांचा गंडा घातला. ही घटना जामनेरच्या आयडीबीआय बँकेसमोर 19 रोजी सकाळी 11.45 वाजता घडली.
काय घडले महिलेसोबत ?
भारती भगवान पाटील (50, शहापूर, ता.जामनेर) या बचत गटाचे काम करतात व त्या गुरुवार, 19 रोजी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास जामनेरच्या आयडीबीआय बँकेत बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आल्या असता त्यांनी रक्कम काढल्यानंतर त्या बँकेबाहेर आल्या. यावेळी पांढर्या रंगाचा शर्ट व निळी जीन्स घातलेला तसेच लाल रंगाचा शर्ट व काळसर पँट घातलेल्या 30 ते 35 वयोगटातील दोघा भामट्यांनी पाटील यांना बोलण्यात गुंतवत त्यांच्याकडून नोटा बदलण्याच्या आमिषाने 19 हजार 500 रुपये लांबवले. काही वेळेनंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जामनेर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळू भोई करीत आहेत.
