खाटू श्यामजींच्या दर्शनाहून परतणार्या धुळ्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात : नऊ जण ठार : सात जखमी
महिला व लहान मुलांचा समावेश : कोट्यातील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू
धुळे (रविवार, 22 नोव्हेंबर 2026) : राजस्थानमधील कोटा येथे धुळे जिल्ह्यातील प्रवाशांवर काळाने घाला घातला. धुळे येथील प्रवाशांना घेऊन जाणार्या क्रुझर वाहनाचा मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. एकाच वाहनातील नऊ प्रवाशांवर काळाने झडप घातल्याने धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्ग-52 वर शनिवारी मध्यरात्री एका ट्रकला भरधाव वेगातील ‘क्रूझर’ (मल्टी-युटिलिटी वाहन) धडकली.
यांचा ओढवला मृत्यू
पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, क्रूझरमधील सर्व प्रवासी धुळे (महाराष्ट्र) येथील रहिवासी आहेत. ते खाटू श्यामजी मंदिराचे दर्शन घेऊन परत येत होते. क्रूझरमध्ये एकाच कुटुंबातील 15 सदस्य होते. अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सज्जन (62) आणि त्यांची पत्नी उषा बाई (60), सुशीला (62), कैलास (35) आणि त्यांची पत्नी अनिता (34), सान्वी (3), बाबूलाल (75), जान्हवी (7) आणि माधवी (32) यांचा समावेश आहे.
तीर्थयात्रेला निघाल्यानंतर अपघात
धुळ्यातील 36 सदस्यांचा एक समूह मंगळवारी धार्मिक तीर्थयात्रेसाठी तीन वेगवेगळ्या गाड्यांतून निघाला होता. त्यांनी आपल्या प्रवासात मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर आणि उज्जैन, त्यानंतर राजस्थानमधील सांवरिया सेठ, अजमेर आणि पुष्कर या ठिकाणांचा समावेश होता. त्यानंतर ते खाटू श्यामजी येथे पोहोचले होते. तीर्थयात्रेत त्यांनी प्रवासाचा आनंद घेतानाचे काही व्हिडिओही रेकॉर्ड केले होते.
राष्ट्रपतींनी व्यक्त केली शोकसंवेदना
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोटा येथील रस्ते अपघाताबाबत ‘एक्स’ (द) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शोक व्यक्त केला आहे.
मृतदेह रुग्णवाहिकेने महाराष्ट्रात पाठवले जाणार
एसडीएम कपिल शर्मा यांनी सांगितले की, सर्व व्यक्तींचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. कोटा प्रशासनाने या नऊ जणांना कोटा येथून महाराष्ट्रात नेण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे.
पती-पत्नी, मुलगा-सून आणि नातीचा मृत्यू
या अपघातात सज्जन (62) आणि त्यांची पत्नी उषा बाई (60), बाबूलाल (75) आणि त्यांची पत्नी सुशीला (62), त्यांचा मुलगा कैलास (35) आणि त्याची पत्नी अनिता (34), नात जान्हवी (7), तसेच माधवी (32) आणि सान्वी (3) यांचा मृत्यू झाला. सज्जन आणि बाबूलाल हे भाऊ होते. सान्वी ही सज्जन यांची नात होती, तर माधवी ही त्यांची सून होती. कैलास एका सलूनमध्ये काम करत असे.
