जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतील युतीचा वाद टोकाला ; आमदार किशोरआप्पा पाटलांकडून पुत्र सुमित पाटील यांच्या वक्तव्याचे समर्थन ; स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करत नसल्याचे सुनावले खडे बोल !
जळगाव (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय वाद आता चांगलाच चिघळला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्याबाबत सुमित पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे त्यांचे वडील आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे समर्थन केले आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकरणावरून त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्याबाबतही सुतोवाचही केले. कुणी आम्हाला अक्कल शिकवण्याची आवश्यकता नसल्याचे खडे बोल त्यांनी सुनावल्याने जिल्ह्यातील निवडणुकीचा वाद अधिकच रंगत असल्याचे चित्र आहे.
अदृश शक्ती म्हणजे आमदार मंगेश चव्हाण
जिल्हा बँक निवडणुकीत सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या प्रकरणावर बोलताना आमदार किशोर पाटील यांनी पडद्यामागे अदृश्य शक्ती कोण असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या महायुतीच्या मेळाव्यातील भाषणाने स्पष्ट झाले असल्याचे सांगितले. आमदार चव्हाण यांनी जाहीर सभेत आपण सुमित पाटील यांचा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यानंतर जॉइंट रजिस्ट्रारला फोन करून अर्ज वैध करण्यासाठी प्रयत्न केल्याचे वक्तव्य केले होते. या भूमिकेचाही आमदार पाटील यांनी समाचार घेतला.
‘त्या’ वक्तव्यामुळे सोडला मेळावा
सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी या प्रकरणामागे अदृश्य शक्ती असल्याचे स्पष्ट केले होते मात्र ही अदृश्य शक्ती नेमकी कोण होती ? हे नंतर समोर आले, असे आमदार किशोर पाटील म्हणाले. जिल्ह्याच्या मेळाव्यात आमदार चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सुमित पाटील नाराज होऊन मेळावा सोडून निघून गेल्याचेही त्यांनी सांगितले.
‘आम्ही स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करत नाही!’
आमदार मंगेश चव्हाण यांना ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत सुमित पाटील यांनी उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्याचे मी कालही समर्थन केले, आजही करतो आणि उद्याही करेन, अशी ठाम भूमिका किशोर पाटील यांनी मांडली त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील वादाला आणखी धार आली आहे.
‘तर भाऊंनी थोबाडीत मारली असती’
सुमित पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत गिरीश महाजन यांनी किशोर पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना किशोर पाटील यांनी गिरीश महाजन यांनी केवळ एकाच बाजूचे म्हणणे ऐकले असल्याचे सांगितले. गिरीश भाऊंनी दुसरी बाजूही ऐकली असती, तर संबंधित व्यक्तीच्या थोबाडीत मारली असती, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. गिरीश महाजन सुमित पाटील यांना नक्कीच न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गुलाबराव पाटलांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू नये !
या वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर किशोर पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील किंवा अन्य कुणीही आम्हाला समजावण्याचा प्रयत्न करू नये. तेवढी अक्कल, बुद्धी आणि क्षमता आमच्यामध्ये आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
जळगावातील राजकीय गार्हाणे मुख्यमंत्र्यांकडे मांडणार !
मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देणार असून घरी बोलावणार असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. भाजप आणि शिवसेनेतील या वाढत्या तणावाचा आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
