सेवाभावी प्रकल्पांतून सकारात्मक परिवर्तन घडवा : प्रांतपाल राजेश पाटील यांचे रोटेरियन्सना आवाहन
रोटरी क्लब भुसावळला प्रांतपालांची अधिकृत भेट उत्साहात
भुसावळ (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : रोटरी क्लब ऑफ भुसावळला गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026 रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रोटे. राजेश पाटील यांची भेट दिली. यावेळी असिस्टंट गव्हर्नर हरविंदरसिंग थेठी हेही उपस्थित होते. सेवाभावी प्रकल्पांतून सकारात्मक परिवर्तन घडवा, असे आवाहन बैठकीत रोटेरीयन्सना यावेळी प्रांतपाल राजेश पाटील यांनी केले.
वर्षभरातील कार्याचा घेतला आढावा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी 5 ते 5.30 या वेळेत प्रांतपाल, असिस्टंट गव्हर्नर, क्लब अध्यक्ष, अध्यक्ष निर्वाचित व सचिव यांची बंदिस्त बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता क्लबच्या संचालक मंडळाच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत क्लबच्या वर्षभरातील कार्याचा आढावा, विविध सेवाप्रकल्प, सामाजिक उपक्रम आणि आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात डॉ.पूर्वा ठाकूर यांनी सादर केलेल्या सुरेल गणेश वंदनाने झाली. प्रांतपाल राजेश पाटील, असिस्टंट गव्हर्नर हरविंदरसिंग थेठी, क्लब अध्यक्ष मदन बोरकर, सचिव जी.आर.अय्यर, इनक्लेव्ह चेअर अनंत पाटील यांच्याहस्ते शारदामातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत
यानंतर प्रांतपाल राजेश पाटील यांचे क्लब अध्यक्ष मदन बोरकर यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला. तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटे. हरविंदरसिंग थेठी यांचे स्वागत व सत्कार क्लबचे सचिव जी.आर.अय्यर यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन केला. यावेळी क्लब अध्यक्ष मदन बोरकर यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या आजपर्यंतच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रम, क्लबचे कार्य चालविण्याची पद्धत तसेच आगामी काळात नियोजित असलेल्या सामाजिक व सेवाभावी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.
गरजूंच्या समस्या लक्षात घेवून कार्य करा
प्रांतपाल राजेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रोटरीचे महत्त्व, रोटरीची सेवाभावी परंपरा आणि समाजोपयोगी प्रकल्पांची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक रोटेरियनने केवळ सभासद म्हणून न राहता समाजातील गरजू घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी उपयुक्त असे सेवाकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांत परिणामकारक प्रकल्प राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच समाजहितासाठी निधी उभारणी करून त्याचा योग्य प्रकारे समाजोपयोगी कामांसाठी विनियोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित रोटेरियन्सना नव्या सेवाकार्यासाठी प्रेरणा मिळाली.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी डॉ.राजेश पाटील यांनी विशेष ल क्षणीय कार्यासाठी जी.आर.ठाकूर यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जी.आर.ठाकूर, अनंत पाटील, महेश भराडे, डॉ.युवराज बढे, डॉ.माया आर्विकर, डॉ.आर्विकर, रत्नाकर क्षीरसागर, संजय चापोरकर, गोपाल तिवारी, मंगला पाटील, अशोक निकम, रेल सिटीचे अध्यक्ष सुयश न्याती, मंगेश यावलकर, डॉ.नितीन दावलभक्त, डॉ.राहुल पांडे, डॉ.समीर चौधरी तसेच श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अलका ढाके यांच्यासह अनेक मान्यवर व रोटरी सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ .नारायण आर्विकर यांनी केले. या कार्यक्रमास जी आर ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. आभार मंगला पाटील यांनी मानले.
