खेळातून शिक्षणाचा अभिनव प्रयोग ! जळगावमध्ये 120 हून अधिक परिचारिकांसाठी ‘केअर’ कार्यशाळा उत्साहात


रावेर (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य अधिक प्रभावीपणे आत्मसात करण्यासाठी खेळाधारित शिक्षणाचा अभिनव प्रयोग जळगाव येथे यशस्वीपणे राबविण्यात आला. ‘महानेकॉन 2026’ व ‘सेकंड खान्देशकॉन’ अंतर्गत वनिता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित ‘केअर’ (क्रिटिकल असेसमेंट, रिससिटेशन अँड इसेन्शियल्स इन निओनेटल नर्सिंग) या विशेष कार्यशाळेत 120 हून अधिक परिचारिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यशाळेचे संचालक डॉ. जेसल शेठ (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र निओनेटल फोरमचे (एनएनएफ) अध्यक्ष डॉ. विनय जोशी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आयोजन समितीमध्ये डॉ. अविनाश भोसले यांचाही सहभाग होता.

या कार्यशाळेत नवजात शिशूंची सुरक्षितता, पुनर्जीवन प्रक्रिया, सेप्सिसचे लवकर निदान, जन्मानंतरचा महत्त्वपूर्ण ‘गोल्डन अवर’, श्वसन सहाय्य, व्हेंटिलेटरची सुरक्षित हाताळणी आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे खेळाधारित शिक्षण पद्धती (गेमिफिकेशन) हा अभिनव उपक्रम ठरला. पारंपरिक व्याख्यान पद्धतीला फाटा देत विविध खेळ, सांघिक आव्हाने, सिम्युलेशन, प्रश्नमंजुषा आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षण अधिक रंजक, संवादात्मक आणि परिणामकारक बनले.

या कार्यशाळेत डॉ. जेसल शेठ (मुंबई), डॉ. किरण मोरे (ठाणे), डॉ. सचिन जेठलिया (बीड), डॉ. नेहा काबरा (जळगाव), डॉ. शैलजा चव्हाण (जळगाव), डॉ. योगिता पाटील (रावेर), डॉ. अमोल सेर (जामनेर), डॉ. सारिका सुरवाडे (जळगाव), डॉ. अनंत बेंडाळे (जळगाव) आणि डॉ. अविनाश खेवडे (जळगाव) यांचा सहभाग व योगदान लाभले.

परिचारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सांघिक भावना आणि शिकण्याची सकारात्मक वृत्ती यामुळे ही कार्यशाळा यशस्वी ठरली. खेळातून शिकण्याच्या या अभिनव पद्धतीमुळे वैद्यकीय ज्ञान सहज आत्मसात करता येते, तसेच प्रत्यक्ष रुग्णसेवेच्या वेळी अधिक आत्मविश्वासाने आणि तत्परतेने काम करता येते, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !