मुख्यमंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंचे स्पष्ट उत्तर; म्हणाले, मी स्वप्नांपेक्षा वास्तवात जगतो!
पुणे (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या स्पष्ट उत्तराची सध्या चर्चा सुरू आहे. पुण्यातील एफसी कॉलेजच्या मैदानावर आयोजित यूथ फेस्टिव्हलमध्ये युवक-युवतींशी संवाद साधताना त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत विचारण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही केवळ ’विश लिस्ट’चा भाग असू शकते; मात्र मी विश लिस्टमध्ये न राहता वास्तवात जगतो, असे उत्तर मुंढे यांनी दिले.
पुण्यातील एफसी कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या यूथ फेस्टिव्हलमध्ये तुकाराम मुंढे यांचे युवक-युवतींसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
हा तर ‘विश लिस्ट’चा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, या प्रश्नावर मुंढे म्हणाले की, मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही केवळ ‘विश लिस्ट’चा भाग आहे. मात्र, मी विश लिस्टमध्ये राहत नाही, तर वास्तवात जगतो. मी एक लोकसेवक आहे. केवळ नोकरीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता आपली भूमिका समजून घेऊन ती प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जपणे, हीच माझ्या जीवनाची व्याख्या आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईबाबतही त्यांनी माहिती दिली. प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल मिळण्यास पूर्वी 30 दिवसांपासून सहा महिन्यांपर्यंत कालावधी लागत होता. आता हा कालावधी कमी होऊन सुमारे 20 दिवसांवर आला आहे. आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून देत शिफ्टमध्ये काम सुरू आहे. आगामी काळात अहवाल मिळण्याचा कालावधी 14 दिवसांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
हेल्थ सप्लिमेंटच्या जाहिरातींवर कारवाईचा इशारा
हेल्थ सप्लिमेंटच्या जाहिरातींमधून मसल्स वाढवण्यासारखे दावे केले जात असल्याबाबत मुंढे यांनी आक्षेप नोंदवला. अशा प्रकारच्या दाव्यांना कायदेशीर मान्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्पादक, विक्रेते तसेच जाहिराती करणार्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चुकीचे दावे करून ग्राहकांची दिशाभूल करणार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिम चालकांनाही नियमांचे पालन बंधनकारक
जिममध्ये हेल्थ सप्लिमेंट किंवा प्रोटीन उत्पादनांची विक्री करणार्यांनाही नियमांचे पालन करावे लागेल. केवळ एफएसएसएआय परवाना असल्याने कोणतेही उत्पादन विकण्याची मुभा मिळत नाही. विक्रीसाठी आवश्यक परवाने असणे आणि विक्री केल्या जाणार्या उत्पादनाची गुणवत्ता, लेबल व दावे योग्य असल्याची खात्री करणे ही विक्रेत्यांची जबाबदारी आहे. चुकीचा ब्रँड, चुकीचे लेबल किंवा दिशाभूल करणारे दावे करणारे उत्पादक, विक्रेते आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
