कुर्ल्यातील मारहाण प्रकरणावरून राजकारण तापले ; महिलांनी कट्यार बाळगावी ; आम्ही सर्वांना तलवारींचे वाटप करणार ! नीलेशचंद्र मुनींचे वादग्रस्त वक्तव्य


मुंबई (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : मुंबईतील कुर्ला परिसरातील सार्वजनिक उद्यानात एका तरुण आणि तरुणीला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापले असून, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नीलेशचंद्र मुनी यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून, आता महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी कट्यार सोबत बाळगल्या पाहिजेत. आम्ही स्वतः सर्वांना तलवारींचे वाटप करणार आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.

नीलेशचंद्र मुनी यांनी मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याच्या घटनेचाही उल्लेख केला. त्यावेळी कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता सार्वजनिक उद्यानात तरुण-तरुणीला 10 ते 15 वर्षांच्या मुलांकडून मारहाण केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित मुलांचा उल्लेख करत त्यांनी आक्षेपार्ह भाष्य केले. लहान असो किंवा मोठा, विषारी साप वेळेवर ठेचला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सहा अल्पवयीन मुलांची 4 डिसेंबरपर्यंत सुधारगृहात रवानगी
कुर्ला येथील सार्वजनिक उद्यानात तरुण आणि तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळाने 4 डिसेंबरपर्यंत सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या मुलांचे वय 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान आहे. शनिवारी त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते.

कुर्ला पश्चिम येथील एका मॉलच्या मागे असलेल्या चिराग नगर परिसरातील प्रमोद महाजन उद्यानात हा प्रकार घडला. शुक्रवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचे टोळके तरुण आणि तरुणीला घेराव घालून काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. दोघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता मुलांनी त्यांचा पाठलागही केला.

उद्यानात नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी चिराग नगरमधील प्रमोद महाजन उद्यानात ही घटना घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये 8 ते 10 अल्पवयीन मुलांचे टोळके तरुण आणि तरुणीला घेराव घालताना दिसत आहे. तरुणाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता मुलांनी त्याच्यावर बेल्ट, काठ्या आणि बुक्क्यांनी हल्ला केला.

या टोळक्याने तरुणीलाही मारहाण केली. तिच्यावर काठ्या व बुक्क्यांनी हल्ला करण्यासोबतच दगडही भिरकावण्यात आले. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिला व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !