हॉटेलच्या गॅलरीतून पडून मुंबईतील प्रौढाचा मृत्यू : भुसावळातील घटना
भुसावळ (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या मुंबईतील 46 वर्षीय प्रौढाचा हॉटेलच्या गॅलरीतून पडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, 22 रोजी मध्यरात्री घडली. शिवानंद शिदाराम माली (46, रा.अंधेरी पूर्व, मुंबई) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
काय घडले भुसावळात ?
रहिम मैहमुद शेख (60, रिक्षा चालक, रा.मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मित्र शिवानंद माली यांच्यासोबत 21 नोव्हेंबर रोजी भुसावळ येथे आले होते. रावेर तालुक्यातील विवरा येथे मजुरांना सोडून रात्री आठच्या सुमारास दोघे वरणगाव रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले. हॉटेलमधील खोली क्रमांक 323 मध्ये दोघांनी मद्यपान व जेवण केले. त्यानंतर ते झोपले. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शिवानंद माली उठून बाहेर जात असताना रहिम शेख यांना जाग आली. कुठे जात असल्याचे विचारल्यावर लघू शंकेसाठी जात असल्याचे सांगून माली बाहेर गेले. त्यानंतर शेख पुन्हा झोपले. सुमारे 20 ते 25 मिनिटांनी जाग आल्यावर मित्र खोलीत नसल्याचे लक्षात आले. शोध घेतला असता शिवानंद माली हॉटेलच्या गॅलरीतून खाली पडलेले दिसले.
बाजारपेठ पोलिसात नोंद
शेख यांनी हॉटेलमधील कर्मचारी व मालकाच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विनोद चौधरी करीत आहेत.
