अनैतिक संबंधांना विरोधानंतर पत्नीची हत्या : पाचोरा तालुक्यातील आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा
जळगाव सत्र न्यायालयाचा निकाल : मुलाला दोन लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश : गुन्ह्याचा यशस्वी तपास, साक्ष ठरली महत्त्वाची
पाचोरा (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून पत्नीची निर्घृण हत्या करणार्या पतीला जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाचोरा तालुक्यातील गाळण शिवारात घडलेल्या या खळबळजनक हत्याकांडातील आरोपी चेतन दलरेसिंग राठोड याला न्यायालयाने दोषी ठरवले. तसेच मृत महिलेच्या मुलाला दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तत्कालीन तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला तर तक्रारदारासह वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली.
असे आहे खून प्रकरण
मृत महिला मनीषा राठोडचा विवाह 19 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी चेतन राठोडसोबत झाला होता मात्र चेतनचे आपल्याच वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याने त्यातून मनीषासोबत त्याचे खटके उडत होते. पतीच्या संबंधाला विरोध केल्याने आरोपीकडून तिचा वारंवार छळ करण्यात आला व गाडीचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली तसेत शिविगाळ करीत मारहाण करून संपवून टाकू, अशी धमकीही देण्यात आली होती. घटनेच्या एक महिन्यांपूर्वी आरोपींनी विवाहितेचे डोकेदेखील फोडले होते.
राहत्या घरात केला खून
आरोपींनी 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी मनीषा घरात असताना तिच्यावर हल्ला करीत तिची हत्या केली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृताचा भाऊ ज्ञानेश्वर पवार यांनी याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपी पती चेतन राठोडसह त्याची वहिनी छायाबाई जयसिंग राठोड, जेठ जयसिंग राठोड व दीर भगवान राठोड यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला.
शवविच्छेदन अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वात तत्कालीन तपासाधिकारी व तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चौधरी यांनी प्रभावीपणे करीत आरोपींविरोधात दोषारापपत्र दाखल केले. पोलीस तपासादरम्यान परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून प्रकरण जळगाव सत्र न्यायालयात पाठविण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी ज्ञानेश्वर पवार तसेच शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव सोनार यांची सलग तीन दिवस नोंदवण्यात आलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
बर्किंगमुळे हत्येचे गूढ उकलले
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मनीषाच्या मृत्यूचे कारण बर्किंग असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. बर्किंग म्हणजे शरीरावर बाह्य जखमा न ठेवता गुदमरवून जीव घेण्याची पद्धत. अशा प्रकारच्या हत्येत शरीरावर ठळक जखमा आढळत नसल्याने गुन्हा सिद्ध करणे आव्हानात्मक ठरते. डॉ.वैभव सोनार यांनी शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांच्या आधारे न्यायालयात महत्त्वपूर्ण साक्ष दिली.
सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड.भारती जे.खडसे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. आरोपीच्या घरात घटनेच्या रात्री मृत महिला आणि आरोपी यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणी उपस्थित नसल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला तसेच परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला. जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश ीमती एस.एन.मोरवाळे यांनी उपलब्ध साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी चेतन राठोड याला पत्नी मनीषाच्या हत्येप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अन्वये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच मृत मनीषाचा मुलगा यश याला दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. अन्य तीन आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी.काबरा यांनीही मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी राजेश भावसार तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे केस वॉच सुनील निकम यांनी सहकार्य केले.
