चोपड्यातील चित्रकार अनिलराज पाटील यांना उत्तराखंडमध्ये सुवर्णपदकाचा सन्मान!


चोपडा (गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026) : उत्तराखंडमधील नैनीताल येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय चित्रकला स्पर्धा व चित्रप्रदर्शनात चोपडा येथील चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांनी खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे.

उत्तराखंडमधील नैनीताल येथील ‘मिट्टी से रंग तक’ या संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील अनेक चित्रकारांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच जळगाव जिल्ह्यातून पुरस्कार मिळवणारे अनिलराज पाटील हे एकमेव चित्रकार ठरले.

अनिलराज यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या चित्रशैलीत साकारलेले गणेशाचे चित्र परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. ‘शुपकर्ण’ असे या चित्राचे नाव असून, या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलात्मक कौशल्याची प्रभावी छाप उमटवली. या उत्कृष्ट कलाकृतीसाठी त्यांना खुल्या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

संस्थेच्या संचालिका डॉ. पूनम शहा यांच्या हस्ते अनिलराज पाटील यांना सुवर्णपदक, पारितोषिक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अनिलराज पाटील यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता उत्तराखंडमधील या यशामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल चोपडा परिसरासह जळगाव जिल्ह्यातील कलाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !