भुसावळात 29 नोव्हेंबरला महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा ; पैठणीसह आकर्षक बक्षिसांची लयलूट !
भुसावळ (गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026) : महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, मनोरंजनातून महिलांना एकत्र आणता यावे आणि त्यांच्यासाठी आनंदाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवअहिर सुवर्णकार समाज मंडळ, भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर स्पर्धा 2026’ आयोजित करण्यात आली आहे. ‘चला खेळ खेळूया पैठणीचा’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा रविवार, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली आहे.
अहिल्यादेवी कन्या विद्यालयात स्पर्धा
भुसावळ येथील जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णकार समाजातील 18 वर्षांवरील महिला व मुलींना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक म्हणून आकर्षक पैठणी, द्वितीय पारितोषिक म्हणून आकर्षक नेकलेस तर तृतीय पारितोषिक म्हणून आकर्षक बांगड्या देण्यात येणार आहेत.
नोंदणी शुल्क 100 रुपये
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 100 रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी नोंदणीसाठी आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांकासह नोंदणी शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट पाठविणे आवश्यक आहे. नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावरच स्पर्धकांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धकांनी स्वतःच्या नावानेच नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धा वेळेवर सुरू होणार असल्याने सर्व स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नवअहिर सुवर्णकार समाज मंडळ, भुसावळ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे महिलांना मनोरंजनाची अनोखी संधी मिळणार असून पैठणी जिंकण्याची उत्सुकता महिलांमध्ये निर्माण झाली आहे.
