शरद पवारांचा पक्ष महायुतीत आल्यास स्वागतच ! पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे सूचक विधान


जळगाव (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या राजकीय चर्चांना आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सध्या शरद पवार गटाचा कल महायुतीकडे दिसत असून, हा पक्ष महायुतीत सहभागी झाल्यास त्यांचे निश्चितच स्वागत केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (दि. 27 नोव्हेंबर) जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

शरद पवार गटाच्या खासदारांना संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी बजावण्यात आलेल्या व्हिपमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्ष अधिवेशनापूर्वी आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याच पद्धतीने व्हिप काढला असावा. मात्र, शरद पवार गट महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा माध्यमांमधून ऐकायला मिळत आहेत. अधिकृत निर्णय होईपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही. तरीही त्यांचा कल महायुतीकडे दिसत असून त्यांनी सोबत येण्याचा निर्णय घेतल्यास स्वागतच केले जाईल.

संजय राऊतांच्या विधानावर गुलाबरावांचा पलटवार
सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरून भाजपला दिलदार म्हणणार्‍या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांना आता कोणाला दिलदार, कोणाला सालदार, कोणाला हमालदार तर कोणाला हवालदार म्हणायचे, एवढेच काम उरले आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने मतदानापूर्वीच 12 जागांवर विजय मिळवत सत्तेचा मार्ग निश्चित केल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी अंतिम निकालानंतर सर्वजण एकत्र बसून सामोपचाराने निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

किशोर पाटील-मंगेश चव्हाण यांच्यातील नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
महायुतीतील आमदार किशोर पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यातील कथित वादावरही त्यांनी भाष्य केले. महायुतीमध्ये मतभेद निर्माण करून राजकीय वातावरण बिघडवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आमदार मंगेश चव्हाण यांनी कोणाला फोन केला, याचे उत्तर ते स्वतः देऊ शकतील. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कामकाजाबाबत आमदार किशोर पाटील यांना शंका असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत उमेदवारी किंवा जागा न मिळाल्याने काहींची नाराजी असणे स्वाभाविक असून, वरिष्ठांच्या माध्यमातून ही कटुता दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गिरणा धरणातून शेतीसाठी 35 दिवसांचे विशेष आवर्तन
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याअभावी जळणार्‍या पिकांच्या प्रश्नावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना दिलासा देणारी माहिती दिली. पावसाअभावी पीक पंचनाम्यांची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने शासनाने दुष्काळी तालुके जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.

शेतातील उभी पिके आणि कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा मंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत गिरणा, वाघूर आणि हतनूर प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. नशिराबाद, असोदा आणि भादली परिसरासाठी एक आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तने आणि शेती व जनावरांच्या चार्‍यासाठी 35 दिवसांचे विशेष आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार
पीक नुकसान भरपाईची रक्कम अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. दिवाळीच्या काळात शेतकर्‍यांना प्राथमिक मदत देण्यात आली आहे. नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी काहीसा विलंब होत आहे. मात्र, शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळेल, अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !