मेहुणबारेतील बनावट विमा अपहार प्रकरण : गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन ; पोलीस अधीक्षकांचे आदेश


जळगाव (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या बनावट विम्याच्या गंभीर गुन्ह्याच्या तपासाला गती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले आहेत.

मेहणबारे पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 328(4), 62(1) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी हे विशेष पथक गठित करण्यात आले आहे. या पथकात अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.

असे आहे विशेष तपास पथक
पर्यवेक्षण अधिकारी म्हणून चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

मेहुणबारे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्याकडे तपास अधिकार्‍याची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय एसआयटीमध्ये पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षकांचे रीडर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचा पथकात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दर दहा दिवसांनी द्यावा लागणार प्रगती अहवाल
विशेष तपास पथकातील अधिकार्‍यांनी तपासाबाबत वेळोवेळी बैठका घेऊन गुन्ह्याच्या तपासाची प्रगती तपासावी. तसेच दर दहा दिवसांनी तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

या एसआयटीच्या माध्यमातून तपासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, गुन्ह्याच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !