साक्रीत महिलेचा जळालेला मृतदेह आढळला ; मृत्यूचे गूढ कायम !
साक्री (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरातील 50 वर्षीय जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा मृतदेह महिलेच्या घरापासून अवघ्या 50 ते 60 फूट अंतरावरील घराजवळ या महिलेला झुडपात मृतदेह आढळला. पूजा रवींद्र क्षीरसागर (50) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या वकील रवींद्र क्षीरसागर यांच्या पत्नी होत.
बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला
गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी पूजा या घरातून बाहेर पडल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. साक्री येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत क्षीरसागर कुटुंब वास्तव्यास आहे. 26 नोव्हेंबर रोजी पूजा क्षीरसागर घरातून बाहेर गेल्या होत्या मात्र त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी घरापासून अवघ्या 50 ते 60 फूट अंतरावरील झुडपात त्यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि सहायक पोलीस निरीक्षक संतोष मुढे यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच न्यायवैद्यक तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
नैराश्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती
पोलीस तपासात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा क्षीरसागर या गेल्या चार ते पाच वर्षांपासून नैराश्याच्या समस्येने त्रस्त होत्या. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासाला वेग दिला आहे.
