मेहुणबारेतील बनावट विमा अपहार प्रकरण : सात आरोपींना अटक
जळगाव (रविवार, 29 नोव्हेंबर 2026) : रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून बनावट साक्षीदार तयार करणे, अपघाताबाबत खोटी माहिती देणे आणि विमा कंपनीकडून लाखो रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी कट रचण्यात आल्या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात चार पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, खासगी एजंट यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील महिलेसह तिच्या पतीसह मुलांची तलावात फेकून हत्या करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेत तब्बल पाच जणांचा मृत्यू ओढवला असून एक बालक सुदैवाने बचावला आहे तर दुसरीकडे मेहुणबार येथे बनावट विमा फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सात आरोपींना 19 नोव्हेंबर रोजी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शनिवारी माध्यमांना दिली.
विमा कंपनीला लुबाडण्यासाठी कट
राजेंद्र शालिंदर जाधव (रा. पाथीमांगे, ता. मालेगाव) यांचा 23 फेब्रुवारी 2024 रोजी नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी संगनमताने योजना आखत जाधव जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावावर विविध विमा कंपन्यांच्या पॉलिसी काढल्या व 19 एप्रिल 2025 रोजी दहिवद फाट्याजवळ अपघात झाल्याचा बनाव रचून जाधव यांचा मृत्यू अपघातात झाल्याचे दाखवण्यात आले. या आधारावर श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीसह इतर 10 विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईचा दावा सादर करण्यात आला.
मेहुणबारे पोलिसांनी या प्रकरणाचा अलीकडेच पर्दाफाश करीत 7 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करीत या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी, भाऊ, डॉक्टर आणि पोलीस कर्मचार्याह एकूण 9 जणांना अटक केली होती तर 19 नोव्हेंबर रोजी पुन्हा 10 संशयीतांविरोधात आयसीआयआयसीआय लोंबार्डतर्फे अन्वेषक मुझम्मील अर्षद शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होताच पुन्हा सात आरोपींना न्यायालयीन कोठडीतून परवानगी घेत अटक करण्यात आली.
तत्कालीन चार पोलीस कर्मचार्यांसह सात आरोपींना अटक
पोलिसांनी बनावट क्लेम प्रकरणात संशयीत प्रवीण मायाराम पाटील, प्रेमचंद त्र्यंबक पाटील, बडतर्फ पोलीस कर्मचारी रवींद्र एकनाथ बत्तीसे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम, महेंद्र प्रकाश पाटील व शवविच्छेदन अहवाल देणारे डॉ.मंदार मुकूंद करंबेळकर यांना कारागृहातून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
