जळगावच्या पोलिसासह सासु-सासर्यांविरुद्ध अखेर खुनाचा गुन्हा

विवाहितेला गळफास देवून मारल्याचा आरोप ; इनकॅमेरा शवविच्छेदन
जळगाव- शनीपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रशांत पाटील यांच्या 26 वर्षीय पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली होती मात्र मुलीचा माहेरून 25 लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी छळ केला व पैसे न दिल्यानेच मुलीला सासरच्यांनी गळफास लावून मारल्याची तक्रार मयताच्या वडिलांनी दिल्याने पोलिस कर्मचारी व पती असलेल्या प्रशांत पाटीलसह सासरे प्रकाश पंडित पाटील, सासु प्रतिभा पंडित पाटील (मोहाडी रोड, नेहरू नगर, जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
25 लाखांसाठी मुलीचा घेतला बळी
मयत भाग्यश्री यांचे वडिल अरुण जगन्नाथ पाटील (61, शिवप्रताप कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. जानेवारी 2016 मध्ये मुलीचे लग्न प्रशांतशी झाल्यानंतर वर्षभर सासरच्यांनी चांगले वागवे मात्र मुलीला नोकरी लावून देण्यासाठी माहेरून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली मात्र परीस्थिती साधारण असल्याने मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे जावयासह सासु-सासर्यांनी तिला मारहाण करून त्रास देण्यास सुरुवात केली. 28 रोजी रात्री तिघाही आरोपींनी मुलीला गळफास देवून ठार मारल्याचा आरोप मयताच्या पित्याने तक्रारीत केल्याने तिघाही आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
इनकॅमेरा मृतदेहाचे शवविच्छेदन
महिलेच्या मृतदेहावर इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पंच म्हणून तहसीलदार विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. विभागीय पोलीस अधिकारी नीलाभ रोहन यांनी नातेवाईकांची भेट घेत वैद्यकीय अहवालानंतरच गुन्हा दाखल करण्याची भूमिका मांडली मात्र नातेवाईकांनी पती, सासू, सासरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
