साकेगाव महामार्गावर राखाडचा ट्रक उलटला
महामार्ग प्राधिकरणाच्या बेपर्वाईने अपघात वाढले ; वाहनधारक संतप्त
भुसावळ : दीपनगरातून राखाड घेवून नरडाण्याकडे निघालेला बल्क टँकर साकेगावजवळील सदगुरू पेट्रोल पंपाजवळ उलटल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने प्राणहानी टळली असलीतरी महामार्ग प्राधिकरणाकरणाच्या बेपर्वाईनेच हा अपघात झाल्याचा आरोप वाहनधारक करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याला लागून असलेल्या साईडपट्ट्या भरण्यात आल्या नसल्याने दुचाकीस्वारांना प्रचंड यातना सोसाव्या लागत आहेत. सुमारे तीन फुटापर्यंत या साईडपट्ट्या खोल गेल्या असून पावसाळ्याचे पाणी साचल्याने वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनधारक आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षाने अपघात वाढले
भुसावळ-जळगाव दरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या काम सुरू असलेतरी साईडपट्ट्या मात्र भरण्यात न आल्याने दुचाकीस्वारांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. बुधवारी रात्री राख घेवून निघालेला टँकर (एम.एच.19 झेड.7262) दुचाकी व चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात साईडपट्ट्यांमध्ये फसल्याने उलटला. सुदैवाने या घटनेत प्राणहानी टळली मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले. वारंवार महामार्ग प्राधिकरणासाठी रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याची मागणी केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात असल्याने या विभागाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा तर नाही ना? असा संतप्त सवाल वाहनधारक उपस्थित करीत आहेत. हीच स्थिती साकेगाव वाय पॉईंटजवळदेखील असल्याने तातडीने दखल घेणे अपेक्षित आहे.