भुसावळातील बीपीएल व अंत्योदय यादीमध्ये ‘झोल’


खर्‍या लाभार्थींना डावलून धनदांडग्यांचा समावेश : शिवसेनेचे निवेदन

भुसावळ : बीपीएल व अंत्योदय यादीमध्ये खर्‍या लाभार्थींना डावलून वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असणार्‍या तसेच 10 ते 20 एकर शेती असणार्‍या व दुमजली इमारत, गाडी असलेल्या नागरीकांचा समावेश असून शहरातील बीपीएल व अंत्योदय यादाीची चौकशी करावी, अशी मागणी शुक्रवारी तहसीलदार महेंद्र पवार यांच्याकडे भुसावळ शहरातील नागरीक व शिवसेना पदाधिकार्‍यांतर्फे करण्यात आली.

खर्‍या लाभार्थींना न्याय देण्याची मागणी
बीपीएलचे सर्व नियम धाब्यावर ठेवून शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ धनदांडगे नागरीक घेत आहेत. अशा लोकांची नावे वगळणे आवश्यक होते परंतु आतापर्यंत प्रशासनाने यावर योग्य कार्यवाही केलेली नाही. गेल्या कित्येक वर्षापासून यादी अपडेट झालेली नसल्याने घोळ समोर येत नाही म्हणून यादी अपडेट होणे आवश्यक आहे. बीपीएल व अंतोदय यादीसाठी फेरसर्व्हेक्षण करुन आपल्या कार्यालयामार्फत योग्य चौकशी करुन लाभार्थींची निवड करण्यात यावी, या यादीतील अपात्र लाभार्थींना वगळण्यात यावे, अशी मागणी भुसावळ शिवसेनेने केली आहे. पात्र लाभार्थी नसणार्‍या नागरीकांची नावे बीपीएल यादीतून कमी करण्यासाठी अर्ज मागवावे अन्यथा गोर-गरीबांच्या हक्कावर डल्ला मारणार्‍या या लोकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. याद्यांची योग्य चौकशी न झाल्यास भुसावळ तहसील कार्यालयासमोर शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपस्थित नागरीकांच्या अडचणी तहसीलदारांनी समजून घेतल्या. नागरीकांनी आणलेली कागदपत्रे जमा करून घेत गोर-गरीबांवर अन्याय होणार नाही, प्रशासनातर्फे योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. निवेदनावर शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, धनराज ठाकूर, नबी पटेल, प्रशांत बागले, मधुकर ढाके, रोहित महाले, विकास खडके, सनी जोहरी, हेमंत बर्‍हाटे, मयूर जाधव, वैशाली ढाके, प्रशांत शिरनामे, सीमा ढाके, चंद्रकांत बडगे, शुभम शेटे, अक्षय चौधरी यांच्या स्वाक्षरी आहेत.


कॉपी करू नका.