वीज ग्राहकांचा भुर्दंड मीटर वाचन कंपनीकडून वसूल करावा


शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांची मागणी

भुसावळ : मार्च-एप्रिल 2020 महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महावितरणने कर्मचार्‍यांची काळजी व ग्राहकांसोबतही कुठलाही संपर्क येऊ नये यासाठी मीटर वाचन बंद केले होते त्यामुळे वीज ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात येत होते. वीज बिलांची छपाईही बंद करण्यात आली होती. दोन-तीन महिन्यांनंतर आता महाविरतणचे काम पूर्वपदावर आले होते त्यामुळे 3 जून 2020 पासून नियमित मीटर वाचन, बिलांची छपाई, छापील बिलांचे वितरण सुरू करण्याचे आदेश महावितरणकडून दिले गेले मासत्र श्रीनगर, खळवाडी, गणेश कॉलनी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर परीसरात दोन-तीन महिन्यांनंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याने वीज ग्राहकांचा बसलेला भुर्दंड मीटर वाचन कंपनीकडून वसूल करावा, अशी मागणी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.

शहरातील अन्य भागातही मीटर वाचन नाही
कंटेन्मेट झोनमध्ये मीटर वाचन किवा बिल व वितरणाचे काम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक ती प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती परंतु इतर भागात मीटर वाचन करणे अपेक्षित असतांना सुद्धा योग्य कार्यवाही केली गेली नाही आता लॉकडाउन शिथील झाल्याने खबरदारी घेत नियमित कामे करण्याच्या सूचना प्रशासनाने अधिकारी, अभियंता, कर्मचार्‍यांना दिल्या असतांना सुद्धा वाचन होत नसेल तर त्याचा आर्थिक भुर्दंड मीटर वाचन कंपनी किंवा त्यांना पाठीशी घालणार्‍या भुसावळ महावितरणच्या अधिकार्‍यांकडून वसूल करावा व मीटर वाचन त्वरित सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सरासरी वीज बिलामुळे उडाला गोंधळ
कोरोनामुळे महावितरणने मार्चपासून वीज मीटर वाचन बंद केले होते. वीज बिलाची छपाई आणि वितरणही थांबविले होते. या काळात ग्राहकांना अचूक बिल देता यावे, यासाठी मोबाईल अ‍ॅपवरुन ग्राहकांना स्वत:च मीटर वाचन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्या ग्राहकांचे मीटर वाचन मिळाले नाही त्यांना मागील बिलाच्या आधारे सरासरी बिल देण्यात आले आणि ग्राहकांचा गोंधळ उडाला. सर्वच ग्राहकांचे मोबाईल नंबर अपडेट नाहीत तर अनेक ग्राहकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांनी स्वतः वाचन करून देऊ शकत नव्हते ही मुख्य समस्या वारंवार सांगून सुद्धा महावितरणने लक्ष दिले नाही, अशी माहिती प्रा.धीरज पाटील यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !